Tisha Kumar Prayer Meet: आपल्या डोळ्यांसमोर अपत्याच्या जाण्याचं दुःख फक्त एक बाबाच समजू शकतो. तो काय परिस्थितीतून जातोय याच्या वेदनाही त्याला व्यक्त करण्यात येत नाही. बॉलीवूड अभिनेते, चित्रपट निर्माते आणि टी-सीरीजचे सहमालक कृष्ण कुमार सध्या याच दुःखातून जात आहेत. नुकतीच त्यांनी त्यांची एकुलती एक मुलगी तिशा कुमार हिला गमावलं आहे. १८ जुलै रोजी कर्करोगामुळे तिचे निधन झाले. ती फक्त २१ वर्षांची होती.
लाडक्या मुलीच्या निधनामुळे कृष्ण कुमार व त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तिशावर दोन दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर तिशाच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये या कुटुंबाचे काही जवळचे मित्र आणि बॉलीवूड सेलिब्रिटी तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. गायक सोनू निगमही इथे आला होता. या शोकसभेत सोनूला अश्रू अनावर झाले व तो हमसून हमसून रडला याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सोनू निगम ढसाढसा रडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कृष्ण कुमार आपल्या मुलीच्या जाण्याने धक्क्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये ते एका जागी बसून आपल्या मुलीच्या आठवणीत हरवलेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मुलीच्या जाण्याचं दुःख स्पष्टपणे दिसून येतंय. याचदरम्यान, सोनू निगम आला आणि कृष्ण कुमार यांना पाहून त्याला अश्रू आवरले नाही. तो त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. त्यानंतर कृष्ण कुमार त्याला सावरताना दिसत आहेत.
सोनूने तिशा अगदी लहान असल्यापासून तिला पाहिलंय, आता अचानक तिच्या निधनाचा सोनूला मोठा धक्का बसला आहे. सोनूचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोक भावुक झाले आहेत. कृष्ण कुमार यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, अशा कमेंट्स लोक या व्हिडीओवर करत आहेत.
सोनू निगम ३० वर्षांपासून टी-सीरीजबरोबर
सोनू निगम व टी-सीरीज यांचं नातं खूप जुनं आहे. जवळपास ३० वर्षांपासून तो या कंपनीत आहे. तो कुमार कुटुंबाच्या खूप जवळ आहे. त्यामुळे तिशाच्या शोकसभेत सोनूला अश्रू अनावर झाले.
बॉबी देओल, फरदीन खान, राकेश रोशन, उदित नारायण, सुनील शेट्टी, अनिल कपूर यांनी तिशा कुमारच्या शोकसभेला हजेरी लावली. हे सर्वजण कृष्ण कुमार यांचे सांत्वन करताना दिसले.