बॉलीवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगमने आजवर त्याच्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्याच्या आवाजातली गाणी आजही लोकांच्या ओठांवर असतात. सोनू निगमने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. याशिवाय तो अनेक ठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्सही करत असतो. या लाईव्ह परफॉर्मन्सला त्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये त्याला एका कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला.
कलाकारांसाठी लाईव्ह परफॉर्मन्समधील चाहत्यांचा रोष काही नवीन नाही. परंतु, कधीकधी या घटना दुर्दैवाने हिंसक होतात, ज्यामध्ये कोणीही जखमी होऊ शकते. सोनू निगमलाही अशाच एका घटनेला सामोरे जावे लागले. प्रेक्षकांच्या संतप्त जमावाने लाईव्ह परफॉर्मन्समध्ये दगडफेक करायला सुरुवात केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (डीटीयू)च्या ‘एंजिफेस्ट २०२५’मध्ये सोनू निगमचा लाईव्ह परफॉर्मन्स होता आणि यादरम्यान विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. सोनूने २३ मार्च (रविवार) रोजी विद्यापीठात लाईव्ह परफॉर्मन्स केला. जेव्हा गायक स्टेजवर पोहोचला, तेव्हा गर्दीतील काही लोकांनी स्टेजवर दगड आणि प्लास्टिक बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. हे पाहून निगमने आपला कार्यक्रम मध्येच थांबवला.
या कार्यक्रमाच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला जमावाने सोनू निगमवर छोट्या छोट्या गोष्टी फेकल्या. यानंतर एकाने त्याच्याकडे गुलाबी रंगाचा हेअर बँडदेखील फेकला. सोनूने हा हेअर बँड स्वत:च्या डोक्यात घालत ‘तुमसे मिलके दिल का जो हाल’ हे गाणं गायला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, सोनूने विद्यार्थ्यांच्या संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रेक्षकांना आवाहन केले की, “मी तुमच्यासाठी इथे आलो आहे, जेणेकरून आपण सर्व जण चांगला वेळ घालवू शकू. मी तुम्हाला ते एन्जॉय करू नका असे सांगत नाहीये, पण कृपया असं काही करू नका.”
सोनूची विनंती होती की, व्यवस्थापनाकडून सुव्यवस्था आणली जावी आणि स्टेजवरील सर्वांना सुरक्षित ठेवावं. या कार्यक्रमात एक लाखांहून अधिक लोक उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्रमांमधील अशा घटनांबद्दल आणि गर्दी नियंत्रणाबाबत चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्येही लोक गर्दी करतात. त्याचे असंख्य चाहते त्याला भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असतात, तर सोनू निगमही शक्य तितक्या चाहत्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो. आपल्या गाण्याने चर्चेत राहणारा सोनू निगम सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो.