Sonu Nigam : बॉलीवूडच्या काही लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणजे सोनू निगम. सोनू निगमने आजवर आपल्या सुमधुर आवाजाने हिंदीसह मराठी रसिकांची मनं जिंकली आहेत. जगभरात त्याच्या आवाजाचे लाखों चाहते आहेत. आपल्या गाण्यांनी व आवाजाने चर्चेत राहणारा सोनू निगम सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच सोनू निगमने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा गैरवापर

गायकाच्या नावाने सोशल मीडियावर काही अकाउंट्स सुरू करण्यात आले असून त्याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा गैरवापर केला जात आहे. याचबद्दल सोनू निगमने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. तसंच या सगळ्याशी त्याचा आणि त्याच्या टीमचा काहीच संबंध नसल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. याबद्दल माहिती देणारी पोस्ट त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

“मी असण्याबद्दल कोणी दावा करत असेल तर सावधगिरी बाळगा”

या पोस्टमध्ये सोनू निगमने असं म्हटलं आहे की, “माझ्या लक्षात आले आहे की, कोणीतरी माझ्या ओळखीचा गैरवापर करत आहे. कृपया लक्षात घ्या की, माझ्या टीममधील कोणीही कोणत्याही कारणास्तव संपर्क साधत नाही. जर कोणी मी असण्याबद्दल दावा करत असेल आणि तुमच्याशी संपर्क साधत असेल तर कृपया सावधगिरी बाळगा.” सोनू निगमने पुढे स्पष्ट केले की, तो गेल्या ८ वर्षांपासून एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर सुद्धा सक्रीय नाही.

“फेक अकाऊंट्सबद्दल तक्रार करा किंवा त्यांना ब्लॉक करा”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, त्याच्या नावाने असे काही अकाउंट आहेत, जे प्रत्यक्षात कोणीतरी चालवत आहेत आणि वादग्रस्त गोष्टी पोस्ट करत आहेत. त्याने चाहत्यांना अशा अकाउंटची तक्रार करण्याचे किंवा त्यांना ब्लॉक करण्याचे आवाहन केले आहे. तसंच शेवटच्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं की, “ज्यांनी मला ही समस्या सांगितली त्यांचे आभार. त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील सदस्यांचे सतत पाठिंब्याबद्दल व समजूतदारपणाबद्दलही खूप खूप आभार.”

“तुमचा पाठिंबा आणि समजुतदारपणाबद्दल सर्वांचे आभार”

या पोस्टच्या त्याने कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “मला फक्त एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करण्यासाठी थोडा वेळ काढायचा होता. जर तुम्हाला माझ्या नावाखाली कोणतेही संशयास्पद/खोटे संदेश आढळले तर तुम्ही अकाऊंटची तक्रार करू शकलात किंवा ब्लॉक करू शकलात तर खूप छान होईल. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि समजुतदारपणाबद्दल सर्वांचे आभार.” दरम्यान, सोनू निगमच्या या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी त्याला पाठींबा दिला आहे.

सोनू निगमच्या हिंदीसह मराठी गाण्यांची रसिकांना भुरळ

‘कल हो ना हो’, ‘अभी मुझ में कही’, ‘कभी खुशी कभी गम’, सपना जहां’ या आणि अशा अनेक गाण्यांनी त्याने आपल्या रसिक श्रोत्यांना भुरळ घातली आहे. बॉलीवूडमध्ये त्याने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सोनू निगम हा केवळ गायकच नाही, तर तो उत्तम माणूस असल्याचेही अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्याच्या गाण्याचे अनेक लाईव्ह शोज होत असतात आणि या लाईव्ह शोजमधून सोनू निगम रसिकांना मंत्रमुग्ध करत असतो.