सोनू सूदने करोनाकाळात केलेल्या मदत कार्यामुळे त्याचे अनेकांनी कौतुक केले. त्याने त्यानंतरही गरजू लोकांना मदत करण्याचे कार्य सुरूच ठेवले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने २० कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीच्या आरोपांवरून त्याच्या घरावर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीबद्दल भाष्य केले.
आयकर छाप्याबाबत मत व्यक्त
‘जिस्ट’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सोनूने सप्टेंबर २०२१ मध्ये त्याच्या घरावर झालेल्या आयकर विभागाच्या छाप्याबद्दल सांगितले तो म्हणाला, “अधिकारी त्यांचे कर्तव्य बजावत होते, आणि अशा प्रकारच्या आव्हानांची मला कल्पना होती. माझ्या घरातील कपाटं किंवा दरवाजांना कधीच कुलुपं नसतात आणि कुणीही सहज घरात प्रवेश करू शकतो. तपासाबद्दल मला काही अडचण नव्हती, कारण त्या काळातही माझ्या घराबाहेर मदतीसाठी लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या, आणि मी लोकांना मदत करत होतो.”
आव्हाने स्वीकारण्याचा दृष्टिकोन
सोनू सूदने पुढे सांगितले की, “मला अशा प्रकारच्या अडथळ्यांची अपेक्षा होतीच. तो म्हणाला, “जीवनात सर्वकाही सुरळीत होईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही, कारण ते शक्य नाही..” सोनू पुढे म्हणाला, “जीवनात कोणतीही वाट निवडताना अशा अडचणींसाठी तयार राहणे गरजेचे असते.”
सोनूने २०२३ मध्ये ‘आप की अदालत’ शोमध्ये त्याच्या घरावर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीबद्दल बोलताना सांगितले की, त्या तपासामध्ये कोणतेही दोषारोप सिद्ध झाले नाहीत. २०२१ मध्ये त्याच्या कंपनीला मिळालेल्या निधीबाबत विचारले असता, त्याने सांगितले की, त्यातील ८०% रक्कम ब्रँड अर्निंग्समधून आली होती. त्याने ब्रँड्सना ही रक्कम स्वतःकडे घेण्याऐवजी थेट त्याच्या फाउंडेशनला देण्याचे निर्देश दिले होते.
सोनू लवकरच ‘फतेह’ या अॅक्शन सिनेमात दिसणार आहे. त्याने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये सोनू सूद जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. ‘फतेह’ हा एक १० जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.