सोनू सूद बॉलीवूडमधील लोकप्रिय स्टार आहे. त्याने हिरोपेक्षा खलनायकाच्या भूमिकेतून चाहत्यांची मने जिंकली आहेत. २०१० मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटात सोनू सूदने छेदी सिंहची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. अलीकडेच सोनू सूदने एका मुलाखतीत त्याला ‘दबंग २’ मध्ये छेदी सिंहच्या भावाची भूमिका ऑफर झाली होती, पण त्याने ती नाकारली असे सांगितले आहे.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद म्हणाला, “सलमान आणि अरबाज माझ्या कुटुंबातील सदस्यासारखे आहेत. त्यांनी मला ‘दबंग २’मध्ये छेदी सिंहच्या भावाची भूमिका साकारण्यासाठी बोलावलं होतं, पण मी नकार दिला. कारण मला कोणत्याही प्रकारे ती भूमिका उत्साहित करत नव्हती. मी हे कारण त्यांना सांगितल्यावर त्यांनी “काही हरकत नाही” अशी प्रतिक्रिया दिली.
‘दबंग २’ मध्ये प्रकाश राजची एन्ट्री
सोनू सूद पुढे म्हणाला की, “‘दबंग २’च्या प्रीमियरला सलमान खानने मला बोलावलं होतं आणि मी आनंदाने उपस्थित राहिलो”. ‘दबंग’ चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये छेदी सिंहच्या भावाचा उल्लेख आहे, जो चुलबुल पांडे (सलमान खान) कडून आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेणार असे त्यात दाखवण्यात आले आहे. मात्र, ‘दबंग २’ मध्ये नवीन खलनायकाच्या भूमिकेत प्रकाश राजची एन्ट्री झाली. निकितीन धीर आणि दीपक डोबरियाल यांनीही या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ हे ब्लॉकबस्टर ठरले, पण ‘दबंग ३’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.
‘फतेह’ रिलीजसाठी सज्ज
सोनू लवकरच ‘फतेह’ या अॅक्शन सिनेमात दिसणार आहे. त्याने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये सोनू सूद जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. ‘फतेह’ हा एक १० जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.