बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. सोनू सूद एक समाजसेवक आहे. कोविडदरम्यान स्थलांतरीत मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करून देण्यापासून ते अनेक सामाजिक कार्ये त्याने आतापर्यंत केली आहेत. या मदतीच्या भावनेमुळे सोनू सूद प्रेक्षकांच्या नजरेत ‘हीरो’ बनला आहे.
सोनू सूद त्याच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अनेक गरजवंत त्याला सोशल मीडियाद्वारे संपर्क साधतात. अशातच सोनू सूदचं व्हॉट्सअॅप अचानक बंद झालंय. याबाबत त्याने इन्स्टाग्राम, एक्स अशा सोशल मीडिया अकाउंटवर स्टोरी शेअर करत तक्रार केली आहे.
सोनू सूदने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात असं दिसतंय की त्याच्या अकाउंटवरून व्हॉट्सअॅप वापरलं जाऊ शकत नाही. याचा स्क्रिनशॉट स्टोरीवर शेअर करत सोनू सूदने लिहिलं, “३६ तास झालेत अजूनही माझं अकाउंट बंदच आहे. तुम्हाला यावर काम करण्याची अत्यंत गरज आहे. १०० गरजवंत लोक माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतील, कृपया तुम्ही तुमचे प्रयत्न करा.”

त्यानंतर दुसरी स्टोरी शेअर करत त्याने लिहिलं, “व्हॉट्सअप, व्हॉट्सअॅप? हजार लोकांपेक्षा जास्त गरजवंत मदतीसाठी मला संपर्क करत असतील, कृपा करून याकडे तुम्ही तातडीने लक्ष द्या, माझं अकाउंट ब्लॉक झालंय.”

अभिनेत्याची ही तक्रार थेट कंपनीपर्यंत पोहोचावी म्हणून दोन्ही स्टोरीजवर सोनू सूदने व्हॉट्सअॅपला टॅग केलं आहे.
या सगळ्या अथक प्रयत्नानंतर शेवटी सोनू सूदचं व्हॉट्सअॅप जवळजवळ एका तासाअगोदर सुरू झालं आणि याबाबतदेखील त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. “शेवटी व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा सुरू झालं आहे. ६१ तासांत फक्त ९४८३ मेसेजेस मला आले आहेत, धन्यवाद.”

दरम्यान, सोनू सूद सध्या ‘फतेह’या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. यात जॅकलिन फर्नांडिस आणि विजय राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. ‘फतेह’ सायबर क्राईमच्या भीषणतेवर आधारित असलेला चित्रपट आहे.