Sonu Sood wife Sonali Sood Health Update: बॉलीवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद (Sonali Sood Accident) हिचा सोमवारी (२४ मार्च रोजी) रात्री मुंबई-नागपूर महामार्गावर वर्धा रोडवर अपघात झाला. या अपघातात सोनाली व तिची बहीण तसेच भाचा जखमी झाले आहेत. सोनाली व तिच्या बहिणीवर नागपुरातील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनालीच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
सोनाली सूद कारने तिची बहीण व बहिणीच्या मुलाबरोबर प्रवास करत होती. त्यांच्या कारने ट्रकला मागून धडक दिली. सोमवारी रात्री १०.३० वाजता हा अपघात झाला. या अपघातात सोनाली, तिची बहीण व भाचा जखमी झाले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोनाली व तिची बहीण सुनीता अद्याप रुग्णालयात असून तिच्या भाच्याला डिस्चार्ज देण्यात आला, असं डॉक्टरांनी सांगितलं.
डॉक्टरांनी काय सांगितलं?
“सोनाली सूद, तिची बहीण आणि भाचा यांना सोमवारी रात्री १०.३० वाजता मॅक्स हॉस्पिटल, नागपूर येथे इमर्जन्सी विभागात आणलं होतं. त्यांचा रस्त्यावर अपघात झाला होता. रुग्णालयात आणलं तेव्हा तिघेही शुद्धीवर होते आणि त्यांची प्रकृती स्थिर होती,” असं डॉक्टरांनी निवेदनात म्हटलं आहे.
“त्यांना खरचटलं होतं आणि जखमा झाल्या होत्या. त्याची तपासणी करण्यात आली आहे, मात्र त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. सोनालीच्या पुतण्याला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सोनाली सूद आणि तिची बहीण देखरेखीखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे,” असंही निवेदनात म्हटलं आहे.
सोनू सूदने सोनालीच्या अपघाताबद्दल दिली माहिती
अपघाताबद्दल समजताच सोनू सूद ताबडतोब नागपूरला रवाना झाला आहे. तो मंगळवारी सकाळीच नागपुरात पोहोचला. “ती आता ठीक आहे. ती या भीषण अपघातातून चमत्कारिकरित्या बचावली आहे. ओम साई राम,” असं सोनू सूद इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला.