Sonu Sood wife Sonali Sood accident : अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. सोनाली मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर एका मोठ्या अपघातात जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (२५ मार्च २०२५ रोजी) रात्री १०.३० वाजता घडली.
सोनाली नागपूरच्या वर्धा रोडवरील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात जखमी झाली. सोनाली सूद ज्या कारमध्ये बसली होती तिने ट्रकला मागून धडक दिली. सोमवारी रात्री १०.३० वाजता हा अपघात झाला. दोन्ही जखमींना नागपुरातील मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोनाली सूदवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने सोनालीच्या अपघाताची पुष्टी केली आहे आणि काही फोटोही शेअर केले आहेत. सोनाली तिची बहीण आणि तिच्या मुलाबरोबर प्रवास करत होती. अपघातात सोनाली व तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपुरात उपचार सुरू आहेत.
सोनाली आणि तिचा बहिणीचा मुलगा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातात सोनालीची बहीण किरकोळ जखमी झाली आहे. सोनालीच्या कारचा (Sonali Sood accident Video) एक व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे, ज्यात कारच्या समोरील भागाचं नुकसान झालेलं दिसत आहे.
अपघाताचा व्हिडीओ –
अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असलेल्या सोनू सूदची पत्नी सोनाली सूद लाइमलाइटपासून दूर राहते. ती सामाजिक कार्यांमध्ये सोनूला मदत करते.
सोनू व सोनाली यांचं लग्न १९९६ मध्ये झालं. सोनाली ही तेलुगू आहे. ती मूळची आंध्र प्रदेशची आहे. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. सोनाली व सोनू यांना अयान व इशांत ही दोन मुलं आहेत.