‘हम आपके है कोन’ हा चित्रपट आजही कित्येक जण तितक्याच आवडीने पाहतात. आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांध्ये विशेषत: ९० च्या काळातील प्रेक्षकांमध्ये कायम असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात सदाबहार अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत झळकले होते. चित्रपटातील त्यांच्या निशा-प्रेम या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती.

‘हम आपके है कौन’ हा चित्रपट सूरज बडजात्या यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने पूर्वी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. अशातच आता चित्रपटाचे निर्माते सूरज बडजात्या यांनी चित्रपटाच्या पुढच्या भागाबद्दल भाष्य केलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सूरज यांनी याबद्दल माहिती दिली. ‘हम आपके है कौन’ चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, “पुढे जाऊन जर कधी ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाचा दुसरा भाग बनविण्याचा विचार केला, तर त्यात सलमान खान माधुरी दीक्षित नसतील. नव्या चेहऱ्यांना घेऊन हा चित्रपट बनविण्यात येईल.”

चित्रपटाच्या पुढच्या भागातील कलाकारांबद्दल बोलताना ते म्हणाले, “वयाच्या एका विशिष्ट टप्पयावर पोहोचल्यानंतर लोक कलाकारांपेक्षा चित्रपटाला प्राधान्य देतात.” जर माझ्याकडे माधुरी व सलमान यांच्यासाठी योग्य अशी स्क्रिप्ट असेल, तरच मी त्यांच्याबरोबर पुन्हा काम करीन. कारण- मला असं वाटतं की, कथा कलाकारांपेक्षा मोठी असते.”

असं असलं तरी सलमान खान व निर्माते सूरज बडजात्या यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. दोघांनीही त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला बऱ्याचदा एकत्र काम केलं आहे. तर, सूरज बडजात्या यांनी सलमान खानला जेव्हा कोणीच कास्ट करत नव्हतं तेव्हा चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि सलमान खाननेही नेहमीच चित्रपटातील कलाकारांपेक्षा चित्रपटाला अधिक महत्त्व दिलं. सूरज बडजात्या व सलमान यांच्यामध्ये वैचारिकदृष्ट्या एकमत असल्याने आजही त्यांची मैत्री कायम असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, सूरज बडजात्या यांनी आजवर ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन’, ‘मेंने प्यार किया’, ‘विवाह’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या अनेक कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईदेखील केली.