अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसतात. त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार, दिग्दर्शक त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. आता बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उंचाई’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. याआधी सूरज बडजात्या यांनी अभिषेक बच्चनबरोबर काम केले होते. तसेच त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने जया बच्चन यांच्या ‘पिया का घर’ यामध्ये काम केले होते. मात्र, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा सूरज बडजात्या यांचा हा पहिलाच अनुभव होता.
ते खूप भीतीदायक…
सूरज बडजात्या यांनी नुकतीच ‘मिड-डे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सूरज बडजात्या म्हणाले, “मी चित्रपटांच्या पटकथांचा अभ्यास करीत होतो. जेव्हा उंचाई या सिनेमाची कथा माझ्या हातात आली, तेव्हा मला वाटले की, यावर मीच चित्रपट बनवावा. हा चित्रपट बनवणे आव्हानात्मक होते. मात्र, माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते आणि त्यामुळे मी तो चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. दोन-तीन महिन्यांत आम्ही चित्रपटासाठी स्क्रिप्ट लिहून काढली. अमिताभ बच्चन यांना चित्रपटासाठी विचारणा करणे, हे सगळ्यात जास्त आव्हानात्मक होते.”
अमिताभ बच्चन यांना स्क्रिप्ट ऐकवण्यापूर्वी एंग्झायटीच्या गोळ्या खाल्ल्या होत्या, अशी आठवण सांगत सूरज बडजात्या म्हणाले, “अमिताभ बच्चन हे डोळ्यांनी ऐकतात. जेव्हा त्यांना कोणी काही सांगत असते, तेव्हा ते डोळ्यांची अजिबात उघडझाप करीत नाहीत. ते खूप भीतीदायक असते. त्यांना स्क्रिप्ट ऐकवण्यापूर्वी मी एंग्झायटीच्या गोळ्या खाल्ल्या होत्या.” विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासमोर ते पहिल्यांदाच स्क्रिप्ट वाचून दाखवणार होते, असे नव्हते. कारण- जेव्हा अभिषेक बच्चन २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं प्यार की दीवानी हूँ’ या चित्रपटात काम करणार होता. त्यावेळी अभिषेक बच्चनबरोबरच अमिताभ बच्चन व जया बच्चन हेसुद्धा स्क्रिप्ट ऐकण्यासाठी उपस्थित होते. या चित्रपटात हृतिक रोशन व करीना कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
‘मैं प्यार की दीवानी हूँ’ हा चित्रपट अयशस्वी ठरला. सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’, हम आपके हैं कौन, हम साथ साथ है या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर या चित्रपटाला पहिल्यांदाच अपयश मिळाले होते. त्यावर सूरज बडजात्या म्हणाले, “मी उत्तम कास्टिंग केली होती. हृतिक, अभिषेक, करीना यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यामुळे माझ्या मनात अपराधी भाव निर्माण झाला. पण, मला जाणीव झाली की, बाकी गोष्टी उत्तम असताना मी मात्र या चित्रपटात मनापासून काम करीत नव्हतो. एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही इतरांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी गोष्टी करता; पण ते तुम्ही नसता.” या चित्रपटाला अपयश मिळाल्यानंतर सूरज बडजात्या यांनी गोविंदाच्या सल्ल्यानुसार असे चित्रपट निर्माण करण्यास सुरुवात केली, ज्या प्रकारच्या चित्रपटांसाठी ते ओळखले जायचे, तसे चित्रपट त्यांनी बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी शाहिद कपूर व अमृता राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला विवाह हा चित्रपट बनवला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर प्रभास व दीपिका पादुकोन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या कल्की एडी १९९८ या चित्रपटात बिग बी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. वैट्टेयन या चित्रपटात साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. सध्या ते कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या मंचावर अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगताना दिसतात, ज्यामुळे बिग बी सातत्याने चर्चेत असतात.