बॉलीवूडमध्ये असे काही दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सूरज बडजात्या(Sooraj Barjatya) हे त्यापैकी एक आहेत. १९८९ ला प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. हा चित्रपट प्रचंड गाजल्याचे पाहायला मिळाले. ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कोन’, ‘विवाह’सारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. विशेष बाब म्हणजे, ३५ वर्षांच्या कारकि‍र्दीत त्यांनी केवळ सात सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. या सात सिनेमांमध्ये ‘मैं प्रेम की दिवाणी हूँ’ या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटाचादेखील समावेश आहे. आता एका मुलाखतीत सूरज बडजात्या यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये इतके अंतर का असते, यावर भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला पटकन राग…

सूरज बडजात्या यांनी नुकतीच गेम चेंजर या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “जेव्हा मी करिअरची सुरुवात केली, त्यावेळी माझा स्वभाव असा होता की मला पटकन राग यायचा. मी अनेक अभिनेत्रींना रडवले आहे. तुम्ही भाग्यश्रीला विचारू शकता. मी ओरडत असे, पण त्यानंतर मला हळूहळू जाणीव झाली की जिथे प्रेम व शांतता असते तिथे काम चांगले होते. पण मी खूप तयारी करतो, जे इतरांना सांगायचे आहे ते मी जवळजवळ २०० वेळा वाचतो. मी प्रत्येक गोष्ट ठीक आहे का ते पाहतो. मी जे काही करतो त्यासाठी मी पूर्णपणे तयारी करतो, त्यामुळेच मला पाच वर्षे लागतात. कारण माझ्यासाठी जेव्हा आम्ही सेटवर असतो तेव्हा आम्ही तिथे काहीतरी निर्माण करण्यासाठी असतो. काही चुकलेले बरोबर करण्यासाठी नाही.”

“मी दिग्दर्शक म्हणून खूप स्वार्थी आहे. जोपर्यंत मी तयार नाही, तोपर्यंत मला कोणती गोष्ट सुरू करावीशी वाटत नाही. जेव्हा करिअरला सुरुवात केली होती, तेव्हादेखील या गोष्टी अशाच होत्या. जर तुम्ही राज कपूर यांचे ‘संगम’, ‘बॉबी’ हे चित्रपट पाहिले तर त्यात तुम्ही हरवून जाता. असे चित्रपट निर्माण करण्यासाठी तुम्हाला खूप तयारी करावी लागते. मी कधीच कमाईचे आकडे पाहत नाही. दिग्दर्शक म्हणून मी कोणाचेही ऐकत नाही. मी प्रत्येक संवादादरम्यान तिथे असतो. मी कधी कोणत्या कोरियोग्राफरचेही ऐकत नाही. मला प्रत्येक गोष्ट लिहिलेल्या स्वरूपात लागते. दृश्यांच्या माध्यमातून समजणाऱ्या संजय भन्साळीसारखा मी नाहीये. मी मणी रत्नमसारखाही नाही. मी गोष्ट सांगणारा असल्याने माझ्यासाठी गोष्ट महत्त्वाची असते. सगळ्या गोष्टी मी स्वत: पाहतो, त्यामुळे या सगळ्याला वेळ लागतो.

जे दिग्दर्शक वेळेला एखादी स्क्रिप्ट सेटवरच लिहितात, त्यांच्याविषयी बोलताना सूरज बडजात्या यांनी म्हटले की त्यांना माझा सलाम आहे. मी अशी अचानक वेळेला स्क्रीप्ट लिहू शकत नाही. मला गोष्टी आहे तशा लागतात. जर कोणी त्यामध्ये अचानक बदल केला, तर मला भीती वाटते. माझ्याबाबतीत असे आहे की मी कायम खूप कलाकारांबरोबर काम करतो. माझ्या चित्रपटात ४० कलाकार असतात, त्यामुळे प्रत्येक कलाकाराचे काय काम आहे, कोणते संवाद आहेत, याबाबत माझे आधीच ठरलेले असते.

दरम्यान, सूरज बडजात्या यांनी म्हटले की, मी दर तीन वर्षांनी चित्रपट दिग्दर्शित करावा, यासाठी मी स्वत:वर काम करत आहे.