तो गाणं म्हणतो.. तो सिनेमाचा आवाज होतो, अभिनय करतो, सिनेमातही आणि नाटकांतही. तो कविताही करतो कारण तो संवेदनशील आहे. बरोबर हे सगळे गुण ज्याच्यात अगदी एकवटले आहेत त्या मनमौजी आणि कलंदर कलाकाराचं नाव आहे पियूष मिश्रा. त्याचे शब्द जादू करतात, थेट काळजात घर करतात. याचं कारण आहे त्याला काळजाला हात कसा घालायचा ते उमगलंय.
तो कविता ऐकवतो आणि आपण ऐकत राहतो
‘कविता’, ‘गीतलेखन’ आणि ‘अभिनय’ अशा प्रांतात मुक्त विहार करणाऱ्या पियूष मिश्राच्या कवितेच्या मैफलींना तरुणाईची गर्दी होते. त्याचा खर्जातला खास आवाज ऐकण्यासाठी. त्याची हटके शैली अनुभवण्यासाठी सगळेच दर्दी प्रेक्षक येतातच. पियूष मिश्राने त्याच्या आयुष्यात पहिली कविता लिहिली ती आठवीत अशताना. ‘जिंदा हो तुम हां कोई शक नाही, सांस लेते हुए देखा मैंने भी है’ या त्याच्या कवितेच्या ओळी होत्या. ‘ब्लॅक फ्रायडे’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित सिनेमासाठी ‘अरे रुक जा रे बंदे…’ हे गाणं पियूषने लिहिलं आणि त्याची प्रतिभा काय आहे? ते सगळ्या जगाला कळलं. पियूषचं खरं नाव प्रियकांत शर्मा होतं. मात्र दहावीत त्याने ते नाव बदलून पियूष असं ठेवलं. हे असं करणं त्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करणं हा त्याचा स्वतःचा निर्णय होता. पियूष लहानपणी निराशेत असायचा. “लहानपणी मला वाटायचं मी कधी मरेन? मला लोक जे सांगायचे ते मी ऐकायचो.” असं एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं.
वो काम भला क्या काम हुआ ही लोकप्रिय कविता
‘वो काम भला क्या काम हुआ?’ ही त्याची कविता आजही त्याने ऐकवावी अशी फर्माहीश केली जाते. गायन, लेखन, अभिनय करुन आणि कवितांमुळे घराघरांत पोहचलेल्या पियूषने रंगमंचावर दीर्घकाळ काम केलं. तसंच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले होते. त्यामुळे त्याच्या अभिनयाचं बावनकशी सोनं तावून सुलाखूनच बाहेर पडलं होतं. त्याच्या अभिनयाला जोड लाभली ती त्याच्या संवेदनशील शब्दांची. १९९८ मध्ये आलेल्या ‘दिल से’, त्यानंतर आलेल्या ‘मकबूल’मध्ये पियूषच्या उत्तम अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना झालं. ‘ओ हुस्ना’ ही कविताही त्याच्या उत्तम कवितांपैकी एक आहे. त्याच्या कवितेचं मुख्य वैशिष्ट्य हेदेखील असतं की त्यात त्या काळाचे, राजकीय परिस्थितीचे संदर्भही असतात. त्याची कविता मातीतली आहे. त्यामुळेच ती आपल्याशी थेट संवाद साधते.
गँग्ज ऑफ वासेपूरचं त्याचं नॅरेशन आजही स्मरणात
‘ओ री दुनिया..’, ‘इक बगल में चांद होगा..’ ही गाणीही पियूषचीच आहेत. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या सिनेमाची त्याची गोष्ट सांगण्याची शैली हीदेखील प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. ‘हम मुसलमानोंकी महाभारत आज भी चल रहीं है..’, ‘इन्सान जो हैं बस तो तरह के होते हैं.. एक होते हैं हरामी और दुसरे बेवकूफ और ये सारा खेल इन दोनोंका ही हैं..’ या संवादाने ती सुरुवात होते. त्यानंतर कानात फक्त त्याचाच आवाज घुमत राहतो आणि थेट आपण त्या सिनेमाचा भाग होऊन तो सिनेमा पाहू लागतो. आवाजाची जादू काय? हे पियूष नकळतपणे आपल्याला सांगून जातो.
अभिनेता व्हायचं हे कसं उलडगलं?
“एखाद्या चित्रकाराला सांगितलं की चित्र काढ तर तो काढून दाखवतो. एखाद्या गायकाला सांगितलं की गाणं म्हण तर तो म्हणतो. मात्र अभिनेत्याचं तसं नसतं. चित्रकार, गायक किंवा इतर कला सादर करणारे लोक रियाज करतात, अभ्यास करतात. अभिनेता अभ्यास करत नाही. त्याचा अभिनय विशिष्ट परिस्थितीतून येतो. तशी परिस्थिती निर्माण करायची हा अभ्यास अभिनेता करत असतो”, असं मत पियूषने मांडलं होतं. “रोज आपण अभिनय का करु शकत नाही? अभिनयाचा सराव कसा करायचा? हे प्रश्न मला सतावू लागले आणि त्याची उत्तरं मिळवण्यासाठी मी अभिनय करु लागलो. एनएसडीच्या शिक्षकांनी ते माझ्यात रुजवलं” असंही पियूष मिश्राने म्हटलं होतं. “‘हॅम्लेट’ या नाटकाने मला अमाप प्रसिद्धी दिली. ही प्रसिद्धी डोक्यात हवा जाण्याइतकी होती.” असंही तो सांगतो. “Act one या संस्थेत जेव्हा आलो त्यानंतर चित्रपटांकडे वळलो” असंही पियूष मिश्राने सांगितलं होतं. एन. के. शर्मा आणि पियूष मिश्रा यांची ओळख अॅक्ट वनमध्ये झाली. त्यावेळी पियूष डाव्या विचारसरणीकडे वळला होता. समाजासाठी काम केलं पाहिजे असं शिकवलं गेलं. त्यावेळी अयोध्येचा प्रश्न निर्माण झाला होता. बाबरी मशिद पाडण्यात आली होती. अशा सगळ्या घडामोडी घडत होत्या. त्यानंतर पियूष मिश्रा म्हणून तो प्रसिद्ध होत गेला. पियूष सांगतो, “‘हमारे दौर’ ही कॅसेटही त्या काळात खूप हिट झाली होती. त्या कॅसेटला नसीरुद्दीन शाह यांनी प्रस्तावना दिली होती. नंतर मात्र खूप वाईट पद्धतीने डाव्या विचारसरणीच्या लोकांशी माझे मतभेद झाले आणि मी अगदी एखादी गोष्ट कापून बाजूला करतात त्याप्रमाणे त्या विचारसरणीपासून बाजूला झालो.” असंही पियूष मिश्राने सांगितलं होतं.
१९९५ मध्ये पियूष मिश्राने ‘सोलो अॅक्टिंग’ सुरु केली. तो काळ त्याच्यासाठी थोडा कठीण होता. त्यानंतर कॅम्पस थिएटर केले. हिंदू कॉलेज, गार्गी कॉलेज या ठिकाणी खूप सारी नाटकं केली. २००० नंतर पियूष मुंबईला आला. त्यानंतर सिनेमांतून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीच.
डोक्यात हवा जाण्याचे दिवस
“१९९० च्या दशकात सुरुवातीला मुंबईत आलो होतो तेव्हा मला स्ट्रगल कसं करायचं ते पण मला माहीत नव्हतं. अॅक्ट वनच्या आधी जेव्हा मुंबईत ते डोक्यात हवा जाण्याचे दिवसच होते. कारण मला नाटकांनी प्रसिद्धी दिली होती. फोटो काढून प्रोफाईल तयार करा, दिग्दर्शक, निर्मात्यांना भेटा हे मला पटतच नव्हतं. त्यामुळे दिल्लीत परतलो. त्यानंतर अॅक्ट वन या ग्रुपशी जोडला गेलो.” असंही पियूषने सांगितलं होतं. ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ सिनेमा लिहिण्यासाठी पियूष मुंबईला २००१ मध्ये आला होता. त्यानंतर २००३ पासून तो इथलाच झाला. “प्रसिद्धीमुळे माणसात अहंकार येतो. मीही त्याला अपवाद नव्हतो. २००५ पर्यंत मी खूपच अहंकारी होतो” असंही पियूषने एका मुलाखतीत सांगितलं होतं. पुढे पियूष म्हणतो, “मनोज वाजपेयी, रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज हे सगळे माझ्या ग्रुपचे होते. त्यांना सिनेमांतून त्यांची ओळख मिळाली होती. पण मला कुणी ओळखत नाही हे मला माझ्या मनात सतावत होतं. तसंच तो एक काळ होता की जेव्हा मी दारुच्या पूर्ण आहारी गेलो होतो.मात्र विपश्यनेने आयुष्यात खूप बदल घडवले” असंही पियूषने सांगितलं होतं.
पियूष म्हणतो, “विनम्रता काय असते, समोरच्या माणसाचा आदर कसा राखायचा असतो? ते २००५ नंतर कळलं. त्याची एक वेगळीच खुमारी होती. एक अहंकारी माणूस जेव्हा विनयशील होतो तेव्हा त्यालाच स्वतःतले बदल कळतात. अहंकारी, उद्धट असण्यातला एक काळ आयुष्यात येऊन गेला होता. त्यानंतर विनयशील होणं, समोरच्याचा आदर करणं हे ठरवून शिकलो. त्यात एक वेगळी मजा होती. विपश्यना केल्याने मी अंतर्बाह्य बदललो. विपश्यना हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. गँग्स वासेपूर या सिनेमानंतर अनेक गोष्टी घडल्या. मी तोपर्यंत खूप विनम्र झालो होतो आणि उद्दामपणा सोडून दिला.”
“आयुष्यात आपल्याला विविध भूमिका करायच्या आहेत हे माझं स्वप्न होतं. ते स्वप्न हवेत पूर्ण होणार नाही हे त्याला कळलं होतं. मला त्या भूमिका मिळाल्याही. मी कुठे चुका केल्या ते त्याला माहीत होतं. तो सगळा अनुभव गाठीशी होता त्यामुळे एक उत्तम अभिनेता होऊ शकलो, भूमिका साकारु शकलो” असं पियूष मिश्राने सांगितलं होतं
अनुराग कश्यपचा तो किस्सा
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या सिनेमाचं शुटिंग पार पडलं. त्यानंतर सगळे कलाकार घरी आले. त्यावेळी अनुराग कश्यपने आपल्याला फोन करुन फिल्मसिटीला बोलवलं. कुर्ता घालून फिल्मसिटीत ये सांगितलं. त्यावेळी मी गेलो. मला अनुरागने सांगितलं की आता कुर्ता काढ आणि स्वतःला चाबकाचे फटके मार. मी त्याला विचारलं हे कुठल्या सिनेमासाठी? तो म्हणाला आपल्याच ‘वासेपूर’ सिनेमासाठीच. मग मी त्याला म्हणलो अरे सिनेमचं शूटिंग तर संपलं आता काय हे? त्यावर अनुराग म्हणाला, तुम्ही फक्त सांगतोय तेवढं करा पुढे तो सीन कुठे वापरायचा मी पाहतो. हा सीन अनुराग कश्यपने नवाजुद्दीन सिद्दीकीचं लग्न होतं असा जो सीन आहे त्यानंतर पहिल्या रात्रीच्या सीन बरोबर टाकला होता. असा किस्सा पियूषने सांगितला होता.
एक कलाकार म्हणून तो त्याचं आयुष्य खूप उत्तम प्रकारे जगला आहे. कवी म्हणून तो संवेदनशील आहे. त्याचा आवाज हा त्याचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. ‘आरंभ है प्रचंड बोले मस्तको कें झुंड.. हे त्याच्या लेखणीतून उतरलेलं आणि त्याच्या आवाजामुळे जिवंत झालेलं अजरामर गाणं आहे. त्याच्या कविता आणि त्याच्या अभिनयांतून तर तो आपल्या समोर येत असतोच.
“आदत जिसको समझे हो
मर्ज कभी बन जाएगा
फिर मर्ज की आदत पड जाएगी
अर्ज ना कुछ कर पाओगे
अगर तबदिली की गुंजाईशने
साथ दिया तो ठिक सही
पर उसने भी गर छोड दिया
तो यार बडे पछताओगे..
जो बूंद कहीं बोतल की थी
तो साथ कहीं दो पल का था
पता नहीं वो दो पलका साथ
कब इक सदींमे बदल गया
हम चुप बैठके सून गुजरे
लम्हें को न समझ सके..
वो कब भिगी उन पलकोकीं
सूर्ख नमींमे बदल गया..
निंद न जाने कहाँ गयी..
उस सहमी-सुकडी रातोंमे..
हम सन्नाटे को चीख
राखसे भरा अंधेरा तकते थे..
या ओळींबाबत पियूष मिश्राने सांगितलं होतं की “मी दारुच्या खूप आहारी गेलो होतो. मोठ्या मुश्किलीने मी ते व्यसन सोडवलं. दारु प्यायची ती सवय सुटल्यानंतर लिहिलेल्या या ओळी आहेत.” कविता ही ज्या माणसाच्या आयुष्यात येते त्या माणसाचं आयुष्य ती बदलून टाकते आणि तो माणूस आपल्या शब्दांतून अनेक गोष्टी बदलण्याची क्षमता बाळगणारा असतो यात काही शंका नाही. पियूष मिश्रा हा एक मनस्वी कलावंत आहे. त्याच्या अभिनयाचे विविध पैलू आपण पाहिले आहेतच. पण तो कसा आहे? हे सांगण्यासाठी त्याचीच एक कविता मला कायम आठवते. पियूषने ‘गँग्ज ऑफ वासेपूर’साठी ‘इक बगल में चाँद होगा’ ही कविता लिहिली होती. सिनेमातल्या परिस्थितीवर अवलंबून अशा ओळी गीतकरा, कवी असलेल्या माणसाला लिहाव्या लागतात. मात्र ही कविता त्याच्याच आयुष्याचं सार सांगणारी आहे असं वाटतं. तो ज्या अंदाजात हे गाणं गायला आहे ते थेट मनाला भिडतं. माणसं जेव्हा पियूषसारखी मनस्वी असतात, तेव्हा ती अशाच अविर्भावात वावरत असतात. पियूषही ‘इक बगलमें चाँद होगा..’ याच अंदाजात तो वावरतोय, वावर राहिल यात शंका नाही. अशा हरफन मौला कलावंताला वाढदिवसाच्या शुभेच्छा!