१९८० च्या दशकात पंजाबमध्ये गायक अमर सिंग चमकीला खूप लोकप्रिय होते. त्या काळात पंजाबमध्ये त्यांचे खूप चाहते होते. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे. ते त्या काळचे पंजाबचे सर्वोत्तम लाईव्ह स्टेज परफॉर्मर मानले जायचे. त्यांची गाणी ऐकण्यासाठी लोक गर्दी करायचे. त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक किस्से आहेत, त्यापैकी काही त्यांच्या बायोपिकमध्ये पाहायला मिळाले. असाच एक किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे. तो म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी यांना अमर सिंग चमकीलांबरोबर सिनेमात काम करण्याची प्रचंड इच्छा होती.
श्रीदेवी यांना चमकीला यांच्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती, त्यासाठी त्या पंजाबी सिनेमात काम करण्यास तयार होत्या. चमकीला यांचा मित्र सावर्ण सिव्हियाने ‘इंडिया टुडे’ला सांगितलं होतं की श्रीदेवी चमकीला यांना गाताना पाहून इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी त्यांना आपल्याबरोबर चित्रपट करण्याची ऑफर दिली होती.
हेही वाचा…विक्रांत मॅस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ला अखेर मिळाली रिलीज डेट, दोनदा पुढे ढकललंय प्रदर्शन
पुढे सिव्हियाने दिलेल्या माहितीनुसार, “श्रीदेवी अमर सिंग चमकीला यांच्या चाहत्या होत्या, त्यांनी त्यांना चित्रपटात हिरो म्हणून काम करण्यासाठी सांगितलं. मात्र, चमकीला यांनी श्रीदेवींना म्हटलं की त्यांना हिंदी बोलता येत नाही. त्यावर श्रीदेवींनी चमकीला यांना एक महिन्यात हिंदी शिकवण्याची ऑफर दिली. पण, चमकीला म्हणाले एका महिन्यात त्यांचे किमान १० लाखांचे नुकसान होईल. त्या काळात, जिथे इतर गायक फक्त ५०० रुपये मानधन घेत असत तिथे चमकीला यांना चार हजार रुपये मानधन मिळत असे. यानंतर श्रीदेवींनी त्यांच्याबरोबर पंजाबी चित्रपट करण्यास होकार दिला, परंतु दुर्दैवाने ते एकत्र काम करू शकले नाही.”
‘द एल्विस ऑफ पंजाब’ अमर सिंग चमकीला
पंजाबच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या अमर सिंग चमकीला यांना त्यांच्या गायनाने प्रचंड प्रसिद्धी मिळाली. चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांचे गाण्याचे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होते, त्यांनी विविध राज्यांमध्ये आपल्या गायनाचे सादरीकरण केले. परंतु, चमकीलांची गाणी आणि त्यांचे संगीत काही लोकांच्या पसंतीस उतरत नव्हते. त्यांना अनेकदा दहशतवादी संघटनांकडून धमक्या येत असत. ८ मार्च १९८८ रोजी त्यांची, त्यांच्या पत्नीची आणि त्यांच्या गटातील इतर दोन सदस्यांची हत्या करण्यात आली होती.
२०२३ मध्ये दिलजीत दोसांझचा ‘जोडी’ हा पंजाबी चित्रपट प्रदर्शित झाला, जो चमकीलांच्या जीवनावर आधारित होता. दिलजीत आणि निम्रत खैरा यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दिलजीतला चमकीलांच्या बायोपिकचे हक्क मिळवता आले नाहीत, म्हणून त्याने ‘जोडी’ हा सिनेमा बनवला. नंतर चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी चमकीलांच्या बायोपिकसाठी दिलजीतशी संपर्क साधला आणि अखेर त्यांनी या गायकाच्या खऱ्या जीवनावर आधारित सिनेमा तयार केला. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.