Srikanth Box Office Collection Day 1 : बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला बायोपिक ‘श्रीकांत’ हा चित्रपट शुक्रवारी (१० मे रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चाहते ‘श्रीकांत’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला आणि ‘श्रीकांत’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.
‘श्रीकांत’ हा नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक ३२ वर्षीय श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित चित्रपटात राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला यांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा आणि राजकुमारच्या दमदार अभिनयाचं समीक्षक आणि प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. पण हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. ‘श्रीकांत’च्या कमाईची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे.
‘श्रीकांत’ पहिल्या दिवसाची कमाई
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘श्रीकांत’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी २.२५ कोटी रुपये कमावले आहेत. हे प्राथमिक आकडे आहेत, अधिकृत डेटा आल्यानंतर या आकडेवारीत थोडे बदल होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘श्रीकांत’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी जवळपास ४० कोटी रुपये खर्च केले आहेत. राजकुमार राव व्यतिरिक्त चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्या दिवसाची कमाई फार चांगली नसली तरी वीकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर
कोण आहेत श्रीकांत बोल्ला?
श्रीकांत हे व्यावसायिक आणि बोलंट इंडस्ट्रीजचे मालक आहेत. त्यांचे गाव आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम शहराजवळ होते. त्यांना शिक्षणासाठी अनेक किलोमीटर चालत जावं लागायचं. भाऊ आणि मित्रांच्या मदतीने ते हा प्रवास करायचे. दिसत नसल्याचे शाळेत फार कोणी त्यांच्याशी बोलायचं नाही. आठव्या वर्षी त्यांना एका अंध मुलांच्या शाळेत दाखल करण्यात आलं. इथेच ते क्रिकेट, पोहणं आणि बुद्धिबळ शिकले.
अर्पिता खानपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर आयुष शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी माझ्या मुलाला…”
माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु ते अंध असल्यामुळे आयआयटीने त्यांना प्रवेश नाकारला. या नकाराने न खचता त्यांनी शिक्षण व्यवस्थेविरुद्ध खटला दाखल केला आणि सहा महिन्यांत खटला जिंकला आणि त्यानंतर पुढील शिक्षण घेतलं. श्रीकांत बोल्ला हे पहिले नेत्रहीन विद्यार्थी आहेत ज्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सायन्स मॅनेजमेंटचा अभ्यास केला. नंतर भारतात परतल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली, त्यासाठी १० कोटी रुपये खर्च आला होता. ही कंपनी इको फ्रेंडली वस्तू बनवते आणि इथं दिव्यांग काम करतात. श्रीकांत बोल्ला यांच्या कंपनीत रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे. त्यांच्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू ५०० कोटी रुपये असल्याचं वृत्त एबीपी लाइव्हने दिलं आहे.