Srikanth Box Office Collection : ‘श्रीकांत’ चित्रपटात बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नेत्रहीन उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित आहे. हा बायोपिक शुक्रवारी (१० मे रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांना कलेक्शनच्या बाबतमीत मागे टाकलं आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करणाऱ्या ‘श्रीकांत’ चित्रपटाने चार दिवसांत एकूण किती कमाई केली आहे, ते जाणून घेऊयात.
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेला हा राजकुमार रावचा पहिला चित्रपट आहे. ‘श्रीकांत’ ची मनाला स्पर्शून जाणारी व प्रेरणादायी कथा लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी होत आहे. राजकुमार रावचा जबरदस्त अभिनय पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता ‘श्रीकांत’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल, असं दिसत आहे.
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास ‘श्रीकांत’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी २.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चित्रपटाच्या कमाईत ८६.६७ टक्क्यांची वाढ झाली आणि त्याने ४.२ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘श्रीकांत’च्या कमाईत शनिवारच्या तुलनेने २५ टक्क्यांनी वाढ झाली आणि त्याने ५.२५ कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसाचे म्हणजेच पहिल्या सोमवारच्या कमाईचे आकडे आले आहेत.
Video: माधुरी दीक्षितच्या मोठ्या बहिणीला पाहिलंत का? ‘तो’ खास व्हिडीओ पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘श्रीकांत’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी १.७५ कोटी रुपये कमावले आहेत. या आकडेवारीसह चार दिवसांत राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची एकूण कमाई १३.४५ कोटी झाली आहे. ‘श्रीकांत’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘मैदान’चा पहिल्या सोमवारचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘मैदान’ने पहिल्या सोमवारी १.५ कोटी रुपये कमावले होते. तर, ‘श्रीकांत’ने १.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘श्रीकांत’ची चार दिवसांची कमाई पाहता ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट लवकरच निम्मा खर्च वसूल करेल, असं दिसतंय.
‘श्रीकांत’ हा नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक ३२ वर्षीय श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित चित्रपटात राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला यांची मुख्य भूमिका साकारली आहे. राजकुमार राव व्यतिरिक्त चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.