Srikanth Box Office Collection : बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला ‘श्रीकांत’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. नेत्रहीन उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला आहे. हा बायोपिक मागच्या शुक्रवारी म्हणजेच १० मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला. एका आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘श्रीकांत’ चित्रपटाने एका आठवड्यात एकूण किती कमाई केली आहे, ते जाणून घेऊयात.
राजकुमार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ हा चित्रपट दृष्टिहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला यांची खरी कहाणी आहे. अवघ्या ३२ व्या वर्षी ५०० कोटींची कंपनी उभारणाऱ्या श्रीकांत यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटात राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला यांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटा राजकुमार रावच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाची ओपनिंग संथ होती, पण वीकेंडला चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा कलेक्शनमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आता आठ दिवसांनी या चित्रपटाचं एकूण बॉक्स कलेक्शन किती आहे, त्यावर नजर टाकुयात.
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘श्रीकांत’ने पहिल्या दिवशी २.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.२ कोटी, तिसऱ्या दिवशी ५.२५ कोटी, चौथ्या दिवशी १.६५ कोटी आणि पाचव्या दिवशी १.६ कोटींची कमाई केली. सहाव्या दिवशी १.५ कोटी आणि सातव्या दिवशी १.४ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने एका आठवड्यात एकूण १७.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने १.३५ कोटी रुपये कमावले आहेत. आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन १९२० कोटी रुपये झाला आहे.
४० कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या सिनेमात राजकुमार राव व्यतिरिक्त ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
कोण आहेत श्रीकांत बोल्ला?
श्रीकांत हे व्यावसायिक आणि बोलंट इंडस्ट्रीजचे मालक आहेत. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु ते अंध असल्यामुळे आयआयटीने त्यांना प्रवेश नाकारला. या नकाराने न खचता त्यांनी शिक्षण व्यवस्थेविरुद्ध खटला दाखल केला आणि सहा महिन्यांत खटला जिंकला आणि त्यानंतर पुढील शिक्षण घेतलं. श्रीकांत बोल्ला हे पहिले नेत्रहीन विद्यार्थी आहेत ज्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सायन्स मॅनेजमेंटचा अभ्यास केला. नंतर भारतात परतल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली