मागच्या आठवड्यात विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सुरक्षारक्षक तपासणी करत असताना शाहरुख खान त्याची आयकॉनिक पोज देताना दिसत होता. पण तो शाहरुख नव्हता असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण त्या व्हिडीओमध्ये दिसणारा शाहरुख खान नाही तर हुबेहुब त्याच्यासारखा दिसणारा इब्राहिम कादरी होता.
इब्राहिम कादरी हा बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानसारखा दिसतो. जर तुम्ही इब्राहिमचे इन्स्टाग्राम स्क्रोल केले तर तुम्हाला ते अकाउंट शाहरुख खानचं आहे, असं वाटू लागतं. दोघांच्या चेहऱ्यात इतके साम्य आहे. अनेकदा इब्राहिम शाहरुखसारखे कपडे परिधान करून सारख्या पोजमध्ये फोटो काढतो. त्याचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. पण या इब्राहिमला कधीच शाहरुख खानला भेटायचं नाहीये, असा खुलासा त्याने केला आहे.
‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत इब्राहिम म्हणाला, “मला वाटतं ज्यादिवशी मी शाहरुख सरांना भेटेन, त्यादिवशी सगळं संपून जाईन. कारण जेव्हा तुमच्याकडे फेरारी नसते तेव्हा तुम्हाला तिची फार क्रेझ असते, ती तुम्हाला हवी असते. पण एकदा ती तुम्ही विकत घेतली की तिला तुम्ही गॅरेजमध्ये ठेवाल. ती तिथेच पडून राहील आणि तुम्ही बाईकवर फिराल. त्याचप्रमाणे त्यांना भेटलो तर माझंही क्रेझ संपेल. त्यांना मला भेटायचं असेल तर मी नक्कीच जाईन, पण मी स्वतःहून कधीच त्यांना भेटणार नाही.”
इब्राहिम शाहरुख खानसारखा दिसतो, पण सुरुवातीला हे सारखं दिसणं त्याने गांभीर्याने घेतलं नाही. “शाहरुख खानच्या रईस चित्रपटानंतर मी ते गांभीर्याने घेतले. मी फक्त १० टक्के शाहरुख सरांसारखा दिसतो, पण नंतर मी माझ्या शरीरावर, केसांवर, वागण्यावर काम केले. आता मी ३० टक्के त्यांच्यासारखा दिसतो,” असं तो म्हणाला.