‘सौदागर’, ‘हीरो’, ‘खलनायक’, ‘परदेस’, ‘ताल’, ‘कर्मा’, ‘यादें’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई(Subhash Ghai) यांनी ८० व ९० च्या दशकात गाजलेल्या अनेक सिनेमांचेही दिग्दर्शन केले होते. विनोद खन्ना, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सलमान खान, शाहरुख खान ते अक्षय खन्ना हे कलाकार त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत दिसले होते. आता मात्र चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांमुळे सध्या चित्र बदलले आहे. तसेच अनेक जण याकडे कलात्मक दृष्टीने बघत नसून, पैसा कमावण्याचे किंवा फक्त काम करण्याचे माध्यम म्हणून बघत असल्याचे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोक सध्या व्हॉट्सअपवर…
सुभाष घई यांनी नुकतीच गेम चेंजर्स या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “मी चित्रपट बनवणे बंद केले आहे. कारण- मला लोकांमध्ये सिनेमाप्रति प्रेम दिसत नाही. अगदी माझ्या टीममध्येसद्धा नाही. ते फक्त काम करीत आहेत.” हे बोलताना त्यांनी एका लेखकाचा एक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले, “मी एका लेखकाला एक कल्पना सांगितली आणि त्यावरून एक कथा लिहिण्यास सांगितले. त्यावर त्याने मला म्हटले की, तो १५ दिवसांत त्याचे काम पूर्ण करील. पहिल्या तीन दिवसांत पहिला ड्राफ्ट देईल. त्याबरोबरच त्याने पूर्ण फीदेखील मागितली. त्याने मला अचूक तारखाही दिल्या आणि सांगितले की, अमुक या तारखेला कथा पूर्ण लिहिलेली असेल. मी त्याला विचारले की, इतक्या पटकन कथा पूर्ण लिहून द्यायला तू चपाती बनवत आहेस का? मी अशा एखाद्या व्यक्तीबरोबर कसा काम करू शकतो? इंडस्ट्रीने स्वत:च त्याला अशा प्रकारे विचार करण्यास शिकवले आहे.
सध्या ज्या पद्धतीने चित्रपट निर्मिती होते, त्यावर टीका करीत सुभाष घई यांनी म्हटले, “लोक सध्या व्हॉट्सअपवर स्क्रिप्ट आणि डायलॉग लिहीत आहेत. खरी सर्जनशीलता कमी होत आहे. काही लोक सांगतात की, स्क्रिप्ट मेलवर पाठवून द्या. तेवढे पुरेसे आहे”, असे म्हणत सुभाष घई यांनी चित्रपट बनवण्यातील, त्यात काम करण्यातील लोकांची आत्मीयता कमी झाल्याचे म्हटले आहे.
याच मुलाखतीत त्यांनी, “आताचे कलाकार स्वत:ला ब्रँड समजत आहेत आणि अभिनयापेक्षा पैशाला प्राधान्य देत आहेत. गेल्या दशकात इंडस्ट्रीला एखादा सुपरस्टार बनविण्यात अपयश आले आहे. म्हणूनच ८० च्या दशकातले कलाकार आजही सुपरस्टार आहेत. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार हे आणि इतर काही आजही सुपरस्टार आहेत. कारण- ते त्या संस्कृतीतून आले आहेत. गेल्या १० वर्षांत रणबीर कपूरशिवाय कोण कोण स्टार बनले? कोणीही नाही”, असे म्हटले.