अदा शर्मा स्टारर चित्रपट ‘द केरला स्टोरी’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे मात्र चित्रपटाबाबत राजकारणही पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘द केरला स्टोरी’वर बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील ‘द केरला स्टोरी’च्या प्रदर्शनावर राज्य सरकारने घातलेली बंदी हटवण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर चित्रपटाचे निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एक विनंती केली आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना विपुल म्हणाले, ‘ मी हात जोडून ममतादीदींना सांगू इच्छितो की तुम्ही चित्रपट पाहा आणि तुम्हाला काही वाटले तर आमच्याशी बोला. आम्ही त्यांचे सर्व वैध मुद्दे ऐकून घेतल्यानंतर आमचे मुद्दे मांडू. ही लोकशाही आहे. माझी विनंती आहे आणि आम्ही वाट बघू. तर सुदीप्तो सेन म्हणाले, ‘सेन्सॉर बोर्डाने पास केल्यानंतर कोणतेही राज्य चित्रपटावर बंदी घालू शकत नाही. ही बंदी बेकायदेशीर होती. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, प्रत्येकाला चित्रपट पाहण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तो आवडो किंवा न आवडो, पण तुम्ही जबरदस्तीने त्यावर बंदी घालू शकत नाही. आमचा न्यायालयावर विश्वास होता आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार.”
तामिळनाडूत सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपटगृहमालकांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांना २० मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चित्रपटात करण्यात आलेल्या ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या दाव्यावर ‘स्पष्टीकरण’ सादर करण्यास सांगितले आहे.
चित्रपटाला पश्चिम बंगालमध्ये घातली होती बंदी
‘द केरला स्टोरी’ ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आधी ते काश्मीर फाइल्स घेऊन आले होते, आता ही केरळची कहाणी आहे आणि नंतर बंगाल फाइल्सची योजना आखत आहेत. भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट चुकीच्या तथ्यांसह केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.”
“द काश्मीर फाइल्स म्हणजे काय? हा चित्रपट काश्मिरी लोकांचा अपमान करण्यासाठी होता. ‘द केरला स्टोरी’ म्हणजे काय?… ही रंगवलेली कथा आहे,” असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. दरम्यान, ममता बॅनर्जी या दुसऱ्या बिगरभाजपा मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी आपल्या राज्यात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही चित्रपटाबाबत असेच आदेश जारी केले होते.्