‘कंवरलाल’, ‘यतीम’, ‘प्रतिघात’ अशा गाजलेल्या चित्रपटांत अभिनेत्री सुजाता मेहता(Sujata Mehta) यांनी काम केले आहे. याबरोबरच अनेक गुजराती चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. स्टार प्लसवरील ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेत त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. आता मात्र त्यांनी एका मुलाखतीत विविध कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, ७० व ८० च्या दशकातील अभिनेत्रींचे कसे संबंध होते, माधुरी दीक्षित व श्रीदेवी(Sridevi) यांच्यातील स्पर्धा, रजनीकांत यांच्या नम्रतेची त्यांच्यावर पडलेली छाप, ऋषी कपूर व रणबीर कपूर यांची तुलना करत त्यांनी वक्तव्य केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.
सुजाता मेहता काय म्हणाल्या?
हिंदी रश या यूट्यूब चॅनेलला त्यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत श्रीदेवींकडे ॲटिट्यूड होता अशी अनेकांची धारणा आहे. यावर बोलताना सुजाता मेहता यांनी म्हटले, “मला तसे कधी वाटले नाही.” सेटवरील एक प्रसंग आठवत त्यांनी म्हटले, “तिच्याबरोबर सतत तिचे कोणीतरी नातेवाईक असत. एकदा माझ्यासाठी तिच्या भाचीला जागा देण्यास तिने सांगितले होते. तिने मला खूप आदर दिला. ती अंतर्मुख होती, फार कमी बोलायची, पण माझ्याशी कायम खूप प्रेमळपणे वागली.”
याबरोबरच जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर श्रीदेवींचे ब्रेकअप झाले होते, त्यावेळी श्रीदेवी अस्वस्थ होत्या असेही म्हटले आहे. सुजाता मेहतांनी म्हटले, “ती खूप अस्वस्थ झाली होती. मात्र, अत्यंत प्रोफेशनल असल्याने श्रीदेवीने त्याचा कामावर परिणाम होऊ दिला नाही. ज्या क्षणी कॅमेरा सुरू होत असे, त्या क्षणापासून तिचा संबंध कॅमेराशी असे. पण, ज्यावेळी सीनचे शूटिंग होत असे, त्यावेळी ती एका कोपऱ्यात शांतपणे बसत असे. ते दोघे एकमेकांच्या खूप प्रेमात होते”, अशी आठवण सुजाता मेहता यांनी सांगितली आहे.
श्रीदेवी व माधुरी दीक्षित यांच्यातील तणावपूर्ण संबंधांवर विचारले असता सुजाता मेहता यांनी म्हटले, “सेटवर त्या दोघी वेगवेगळ्या ठिकाणी बसत असत. माधुरी कोणाशीच बोलत नसे. तिच्या तिच्या वॉकमॅनबरोबर तिच्या कोपऱ्यात बसत असे.”
१९८७ साली प्रदर्शित झालेला ‘जमीन’ या चित्रपटात सुजाता मेहता यांनी काम केले होते. रजनीकांत यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना त्यांनी म्हटले, “त्यांच्याकडे हिरो लूक नाहीये, पण ते सुपरस्टार आहेत. त्यांच्याकडे अहंकार नाही”, असे म्हणत रजनीकांत यांच्या नम्र स्वभावाचे त्यांनी कौतुक केले.
याबरोबरच रणबीर कपूर उत्तम अभिनेता असल्याचे त्यांनी म्हटले. जान्हवी कपूरचा एकही चित्रपट अद्याप पाहिला नसल्याचे म्हणत तिचे फक्त जाहिरातींमधील काम पाहिल्याचे सांगितले. आताच्या पिढीतील आवडत्या कलाकाराविषयी बोलताना त्यांनी आलिया भट्टचे नाव घेतले. तिच्याबरोबर कधीतरी काम करायला आवडेल असेही म्हटले.