अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी हॉलिवूड अभिनेता जीन-क्लॉड व्हॅन डॅमेबरोबर एक फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोवरून गायक मिका सिंगने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरबरोबर असलेल्या नात्यामुळे जॅकलिनला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. याच सुकेशचं नाव घेत मिकाने जॅकलिनला टोला लगावला. त्यानंतर संतापलेल्या सुकेशने मिकाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

जॅकलिनने हॉलिवूड अभिनेत्याबरोबर शेअर केला फोटो; प्रसिद्ध गायकाने ठग सुकेशचं नाव घेत लगावला टोला, म्हणाला…

मिकाने जॅकलिनचा जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिलं, “तू खूप सुंदर दिसत आहेस. हा सुकेशपेक्षा कैक पटीने चांगला आहे.” मिकाने नंतर मात्र ही पोस्ट डिलीट केली, पण त्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून संतापलेल्या सुकेशने आता मिकाला नोटीस पाठवली आहे.

Mika Singh Trolls Jacqueline Fernandez Over Conman Sukesh
मिका सिंगने केलेली पोस्ट

सुकेशचे वकील अनंत मलिक यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये लिहिलं, “तुमच्या विधानामुळे आमच्या क्लायंटच्या चारित्र्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सार्वजनिकरित्या चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे त्यांची मीडिया ट्रायल सुरू झाली आहे. या परिस्थितीमुळे त्यांचा सध्याचा त्रास वाढला आहे आणि यामुळे अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. त्यामुळे तुमच्या निदर्शनास आणून देण्यात येतंय की अपमानास्पद टिप्पणी करून तुम्ही मानहानीचा गंभीर फौजदारी गुन्हा केला आहे आणि म्हणून भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४९९/५०० च्या तरतुदींनुसार तुमच्यावर खटला चालवला जाऊ शकतो.” यासंदर्भात ‘पिंकव्हिला’ने वृत्त दिलंय.

दरम्यान, सुकेश चंद्रशेखर २०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सध्या दिल्लीतील तुरुंगात आहे. सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याची बाब समोर आली होती. तिचे सुकेशबरोबरचे काही रोमँटिक फोटोही व्हायरल झाले होते, त्यावरून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. सुकेश बऱ्याचदा जॅकलिनला तुरुंगातून पत्रंही लिहित असतो.