Suniel Shetty and K L Rahul buy land: अभिनेते सुनील शेट्टी हे काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहेत. सुनील शेट्टी यांची लेक आथिया शेट्टीला नुकतीच मुलगी झाली आहे. नातीला हातात घेतल्यानंतरचा आनंद वेगळाच असल्याचे त्यांनी म्हटले होते. आथियाचे लग्न भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू के. एल. राहुलबरोबर झाले आहे.

सुनील शेट्टींनी जावयाबरोबर मिळून विकत घेतली ७ एकर जमीन

आथिया शेट्टी व के. एल. राहुल यांनी २३ जानेवारी २०२३ ला लग्नगाठ बांधली होती. त्यांना २४ मार्च २०२५ ला एक मुलगी झाली आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर आथिया व के एल राहुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. नुकतीच सुनील शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला. आता बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते सुनील शेट्टी व के. एल. राहुल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

जमिनीची किंमत किती?

के. एल. राहुल व सुनील शेट्टी यांनी नुकतीच जमीन खरेदी केली आहे. ‘स्क्वेअर यार्ड्स’कडे असलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, के. एल. राहुल आणि सुनील शेट्टी यांनी ओवाळे येथे सात एकर जमीन खरेदी केली आहे. हे ठिकाण मुंबईजवळील ठाणे पश्चिम येथे आहे. या जमिनीची किंमत ९.८५ कोटी इतकी आहे. ही जमीन खरेदी करताना त्यांना ६८.९३ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आहे. तर ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागले आहे. हा व्यवहार २० मार्च २०२५ ला झाला आहे.

याआधी के. एल. राहुल व आथिया शेट्टी यांनी जुलै २०२४ ला पाली हिल परिसरात अपार्टमेंट घेतली होती. त्याची किंमत २० कोटी होती. या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ ३,३५० चौरस फूट इतके आहे. तर, २०२४ मध्ये सुनील शेट्टी व त्यांचा मुलगा अहान शेट्टी यांनी मुंबईत ८.०१ कोटींची मालमत्ता खरेदी केली होती.

दरम्यान, सुनिल शेट्टी यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. मोहरा, दिलवाले, राक्षस, सपूत, हम है बेमिसाल, बॉर्डर, पृथ्वी,धडकन, थँक्यू अशा अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी काही भूमिका या नायकाच्या आहेत. तर काही भूमिका या खलनायकाच्या आहेत. त्याच्या अनेक भूमिका प्रचंड गाजल्या. धडकन चित्रपटातील देव या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले.