उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईतील चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये तयार होणाऱ्या फिल्म सिटीमध्ये चित्रपटांचे शूटिंग करताना हिंदी चित्रपट निर्मात्यांना मिळू शकणार्या विविध संधींबद्दल चर्चा केली. या बैठकीत अभिनेता सुनील शेट्टीदेखील उपस्थित होता. “प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात आणणं महत्त्वाचं आहे. तसेच चित्रपटसृष्टी ही चांगली काम करणाऱ्या चांगल्या माणसांनी बनलेली आहे, हे त्यांना पटवलून द्यायला हवं,” असं तो म्हणाला. #BoycottBollywood या हॅशटॅगने सोशल मीडियावर निर्माण होत असलेल्या बॉलिवूडविरोधी भावनांपासून मुक्त होण्यासाठी त्याने आदित्यनाथ यांची मदत मागितली.
“तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली, मग उर्फीला का नाही?”, चित्रा वाघ यांचा महिला आयोगाला सवाल
उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीने स्थानिकांना त्याचा एक भाग होण्यासाठी आणि त्यांना रोजगार देण्यासाठी कसे प्रोत्साहित केले पाहिजे याबद्दल सुनील शेट्टीने भाष्य केलं. “आपण कलाकार घडवण्यावर भर दिला पाहिजे. तसेच टेक्निकल कामे करणारे संघ तयार करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून, जेव्हा शूटींग करायला लोक तिथे जातील, तेव्हा ते छोट्या छोट्या युनिटसोबत जातील आणि बाकिची मदत स्थानिक कर्मचाऱ्यांकडून घेतली जाईल. त्यामुळे प्रोजेक्ट हिट झाल्यास त्याचा फायदा स्थानिकांना होईल,” असं सुनील म्हणाला. पुढे अभिनेत्याने प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत आणि त्यांना पुन्हा सिनेमागृहात जाण्यासाठी कसे प्रोत्साहित करता येईल, याबद्दल भाष्य केलं. “आज जर आपल्याला समस्या भेडसावत असेल तर ती पैसे किंवा सब्सिडीची नाही, तर प्रेक्षकांची आहे. प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये आणायचे आहे. ते खूप महत्वाचे आहे. तसेच बॉयकॉट बॉलिवूड हा हॅशटॅग चिंता वाढवणारा आहे,” असं मत सुनीलने व्यक्त केलं.
तो योगी आदित्यनाथ यांना म्हणाला, “हा जो बॉयकॉट बॉलिवूड हॅशटॅग चालू आहे, तो तुम्ही म्हटल्यास थांबू शकतो. त्यासाठी आम्ही चांगलं काम करत आहोत, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. वाईट लोक सगळीकडेच असतात, पण एक वाईट असल्याने सगळेच वाईट आहेत, असं होत नाही. आज लोकांना वाटतं की बॉलिवूड चांगलं नाही. पण आम्ही इथे इतके चांगले चित्रपट बनवले आहेत. मीही अशाच एका चित्रपटाचा भाग होतो. मी बॉर्डर चित्रपट केला होता. बॉयकॉट बॉलिवूड हॅशटॅगपासून आपली सुटका कशी करता येईल यासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपण हा ट्रेंड कसा थांबवू शकतो याचा शोध घ्यावा लागेल.”
“माझा नंगानाच सुरुच राहणार” म्हणणाऱ्या उर्फी जावेदला चित्रा वाघ यांचा इशारा; म्हणाल्या, “तिला…”
अभिनेता म्हणाला, “आज मी जर सुनील शेट्टी आहे तर ते यूपी आणि तिथल्या चाहत्यांमुळे आहे. त्यांनी शुक्रवारी चित्रपटगृहे भरली आणि त्यामुळेच आम्हाला तो चित्रपट चालेल असं कळलं. हे पुन्हा होऊ शकतं, पण तुम्हाला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. आमच्यावर असलेला हा कलंक नाहीसा होणं खूप महत्त्वाचं आहे. मला हे पाहून खूप त्रास होतो. कारण आमच्यापैकी ९९% लोक असे नाहीत. आम्ही दिवसभर ड्रग्स घेत नाही, आम्ही चुकीची कामं करत नाहीत. आम्ही चांगलं करतो, भारताला जर बाहेरच्या देशांशी कुणी जोडलं असेल तर ते बॉलिवूडच्या कथा व संगीताने जोडलंय. त्यामुळे योगीजी तुम्ही पुढाकार घेऊन पंतप्रधानांशी याबद्दल बोललात तर खूप फरक पडेल,” अशी विनंती सुनील शेट्टीने योगी आदित्यनाथ यांना केली.