बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू केएल राहुलबरोबर लग्नाच्या बेडीत अडकली. मोठ्या धामधूमीत अथिया आणि केएल राहुल यांचं लग्न अभिनेता सुनील शेट्टीच्या लोणावळ्यातील फार्म हाऊसवर पार पडलं. दोघंही मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थित लग्नाच्या बेडीत अडकले. आता सासरा सुनील शेट्टीने जावईशी पहिली भेट कशी झाली होती याबद्दल सांगितलं आहे. एका शोमध्ये सुनील शेट्टीने केएल राहुलला पहिल्यांदा कधी आणि कुठे भेटला हे सांगितलं.
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनील शेट्टी भारतीतल पहिला MMA रिअलिटी शो ‘कुमाइट १ वॉरियर हंट’चं प्रमोशन करण्यासाठी पोहोचला होता. या प्रमोशनसाठी द ग्रेट खलीनेही हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना सुनील शेट्टीने आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल सांगितलं. तसेच क्रिकेटर केएल राहुलशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. सुनील शेट्टीने सांगितलं की जेव्हा तो पहिल्यांदा केएल राहुलला भेटला होता तेव्हा त्याला माहीत नव्हतं की त्याची मुलगी आणि केएल राहुल एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते.
आणखी वाचा- “आजकाल अॅक्शन हिरोची पदवी…” चित्रपटातील स्टंटबाजीवर सुनील शेट्टीने केले थेट भाष्य
सुनील शेट्टीने सांगितलं की तो जावई केएल राहुलला पहिल्यांदा २०१९ मध्ये एका विमानतळावर भेटला होता आणि त्यावेळी त्याला समजलं की दोघांचही होमटाऊन एकच म्हणजे मंगळुरू आहे. त्यानंतर त्याला हेही समजलं की केएल राहुल आधीपासूनच त्याच्या मुलीला ओळखतो आणि दोघांचा एकमेकांशी संपर्क आहे.
मिड डेच्या एका रिपोर्टनुसार, सुनील शेट्टी जावयाशी पहिल्या भेटीची आठवण सांगताना म्हणाला, “मी राहुलला पहिल्यांदा एका विमानतळावर भेटलो होतो. तो माझ्याच होमटाऊन मंगळुरूमधील आहे हे ऐकून मी खूप उत्साही झालो. मी त्याचा चाहता होतो आणि तो त्याच्या करिअरमध्ये चांगलं करत आहे हे पाहून मला आनंद झाला. मी घरी आलो तेव्हा अथिया आणि माझ्या पत्नी याबद्दल सांगितलं. तेव्हा त्या जास्त काही बोलल्या नाहीत पण त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. नंतर माझ्या पत्नीने मला सांगितलं की अथिया आणि राहुल यांच्यात बोलणं होतं.”
आणखी वाचा- मीका सिंहबरोबर रोमान्स, कमी वयामुळे झाली ट्रोल; रीवा अरोरा म्हणते, “मी १२ वर्षांची…”
सुनील शेट्टी पुढे म्हणाला, “मला आश्चर्य वाटलं होतं की अथियाने याबाबत मला काहीच सांगितलं नव्हतं. मी आनंदी होतो कारण तिला दक्षिण भारतीय मुलांशीच संपर्क ठेवण्यास सांगितलं होतं. मंगळुरूमध्ये राहुलचं घरही आहे. त्याचे आई-वडील तिथेच राहतात. त्याचं घर माझं जन्मगाव मुल्कीपासून काही किलोमीटरवर आहे आणि माझ्यासाठी हा सुखद योगायोग होता.”