जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टीने ज्या निवृत्त बीएसएफ जवान भैरो सिंह राठोड यांची भूमिका साकारली होती. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. बॉर्डर सेक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ही माहिती देण्यात आली. भैरो सिंह यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सुनील शेट्टीने शोक व्यक्त केला. त्याने ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान लाँगेवाला या ठिकाणच्या विलक्षण शौर्यासाठी भैरो सिंह ओळखले जातात. या शौर्यासाठी त्यांना १९७२ मध्ये सेना पदक मिळालं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी जोधपूरमधल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ डिसेंबर रोजी भैरो सिंह यांच्याशी फोनवरुन प्रकृतीची विचारपूस केली होती. सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८१ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोमवारी (१९ डिसेंबर) बीएसएफकडून भैरो सिंह यांच्या निधनाबद्दल एक ट्वीट करण्यात आले होते. त्यात त्यांनी त्यांचा फोटोही शेअर केला होता. “१९७१ साली झालेल्या लाँगेवालाच्या लढाईतील हिरो नायक (निवृत्त) भैरो सिंह राठोड यांच्या निधनाप्रती बीएसएफचे डीजी आणि सर्व रँकच्या अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला. बीएसएफ त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि कर्तव्याप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाला सलाम करते. या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत”, असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
भैरो सिंह यांच्या निधनाची माहिती मिळताच सुनील शेट्टीने ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुनील शेट्टी यांनी बीएसएफने केलेले ट्वीट रिट्वीट केले आहे. “भैरो सिंह यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.” असे त्यांनी यात म्हटले आहे.
दरम्यान १९७१ च्या लाँगेवालाच्या लढाईवर आधारित ‘बॉर्डर’ या चित्रपटात सुनील शेट्टी यांची प्रमुख भूमिका होती. त्याबरोबरच या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुदेश बेरी, पुनीत इस्सार आणि कुलभूषण खरबंदा यांनी भूमिका साकारल्या होत्या. तर तब्बू, राखी, पूजा भट्ट आणि शरबानी मुखर्जी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.