अभिनेता सुनील शेट्टीचं क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. मी अभिनेता नसतो, तर नक्कीच क्रिकेटपटू असतो, असं सुनील अनेकदा म्हणत दिसतो. सुनील क्रिकेटपटू बनू शकला नाही, मात्र त्याचा जावई केएल राहुल हा एक लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू आहे. बऱ्याचदा तो केएलच्या खेळाबद्दलही भाष्य करत असतो.
अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय?
मागच्या काही महिन्यांपासून केएल राहुल त्याच्या खराब कामगिरीमुळे टीकेस पात्र ठरत आहे. पण, जेव्हा तो मैदानावर खराब कामगिरी करतो तेव्हा त्याला घरी त्याबद्दल चर्चा करायला आवडत नाही, असा खुलासा सुनील शेट्टीने केला आहे. सिद्धार्थ काननला दिलेल्या एका मुलाखतीत सुनील म्हणाला की तो केएल राहुलसारख्या व्यक्तीला क्रिकेटबद्दल काहीही शिकवू शकत नाही, कारण तो देशासाठी खेळतो आणि त्या खेळात तो तज्ज्ञ आहे.
सुनील शेट्टी म्हणाला, “मी एक तरुण मुलगा कठीण काळातून जात असल्याचे पाहतो आणि आपण त्याला काय बोलणार, फक्त त्याची बॅटच बोलणार, नाहीतर बोलून काही फायदा नाही. त्याला तिथे जावे लागेल, त्या चेंडूला सामोरे जावे लागेल आणि खेळावे लागेल आणि तो ते करेल आणि तो ते करत राहील.”
मृणाल ठाकूरचे बिकिनीतील फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “फॉलोअर्स वाढवण्यासाठी…”
सुनील पुढे म्हणाला, “जेव्हा केएल राहुल धावा करू शकत नाही, तेव्हा आम्ही त्याच्या अपयश किंवा खराब खेळावर चर्चा करत नाही. तो एक योद्धा आहे, हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. आम्ही त्याच्याशी जगभरातील गोष्टींबद्दल बोलतो, जेणेकरून तो खराब कामगिरीबद्दल सातत्याने विचार करणार नाही. मी केएल राहुलला क्रिकेट कसे खेळायचे हे शिकवू शकत नाही. तो देशासाठी खेळत आहे. तो काही गल्लीत क्रिकेट खेळत नाही, ज्याला मी क्रिकेट खेळण्याचा सल्ला देईन”, अशा स्पष्ट शब्दांत सुनीलने उत्तर दिलं.