Suniel Shetty Property : अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांनी नुकतीच मुंबईतील मुलुंड भागात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली. त्यानंतर आता सुनील शेट्टी व त्याच्या मुलानेदेखील मुंबईत मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी दोघांनी कोट्यवधी रुपये मोजले आहेत.

अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा मुलगा अहान शेट्टीबरोबर नुकतीच मुंबईत ८.१ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. स्क्वेअर यार्ड्सवरील नोंदणी दस्तऐवजानुसार, त्यांनी विकत घेतलेली मालमत्ता खार पश्चिम (वांद्रे) येथे आहे. पिता-पुत्रांनी बँकेच्या लिलावात ही मालमत्ता विकत घेतली आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार, सुनील व अहान यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे क्षेत्रफळ १११.५२ चौरस मीटर म्हणजेच १,२००.३९ चौरस फूट आहे. या महिन्यात या मालमत्तेची डील झाली. यासाठी त्यांनी ४०.०८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी व ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले.

हेही वाचा – अमिताभ बच्चन-अभिषेक बच्चन यांनी मुलुंडमध्ये विकत घेतली १० अपार्टमेंट्स, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

स्क्वेअर यार्ड्सवर उपलब्ध माहितीनुसार, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींनी अलीकडेच मुंबईतील वांद्रे भागात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली.

सुनील शेट्टी व अहान शेट्टी (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचे नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांनी खरेदी केली मालमत्ता

स्क्वेअर यार्ड्सवरील नोंदणी दस्तऐवजानुसार, अमिताभ व अभिषेक बच्चन यांनी मुलुंड येथील ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम निवासी प्रकल्प इटर्नियामध्ये १० अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत. यापैकी ८ अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ प्रत्येकी १,०४९ चौरस फूट आहे. तर, इतर दोन अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ ९१२ चौरस फूट प्रत्येकी आहेत. २५.९५ कोटी रुपयांत त्यांनी १०,२१६ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली मालमत्ता खरेदी केली आहे.

हेही वाचा – जान्हवी किल्लेकर पोहोचली ‘गुलिगत’च्या गावी! सूरज चव्हाणची घेतली भेट, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “बहिणीचा दर्जा दिला…”

१० अपार्टमेंटपैकी सहा अभिषेक बच्चनने विकत घेतली आहेत. अभिषेकने यासाठी १४.७७ कोटी रुपये मोजले आहेत. तर इतर चार अपार्टमेंट्स अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली आहेत. या अपार्टमेंट्सची किंमत १०.१८ कोटी रुपये आहे. यासाठी अमिताभ व अभिषेक यांनी १.५० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहेत.