आज नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान-निकोबार बेटावरील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधान उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी अंदमान-निकोबारवरील २१ बेटांचं नामकरणही केलं. या २१ बेटांना आता परमवीर चक्र प्राप्त विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचं बॉलिवूड सेलिब्रिटीही स्वागत करत आहेत.
अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीचं आज लग्न आहे. अशातच पंतप्रधान मोदींच्या या नामकरणाच्या निर्णयानंतर सुनील शेट्टीने ट्वीट करत त्यांचे आभार मानले. अभिनेत्याच्या या ट्वीटवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. मुलीच्या लग्नाच्या दिवशी वेळ काढून सुनील शेट्टीने केलेल्या या ट्वीटची चांगलीच चर्चा होत आहे.
“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, महान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त अंदमान-निकोबारच्या २१ बेटांचे परमवीरचक्र पुरस्कार विजेते, आपल्या राष्ट्राचे खरे नायक यांच्या नावाने नामकरण केल्याबद्दल अभिमान वाटतोय,” असं ट्वीट सुनील शेट्टीने केलं होतं.
“भावा, मुलीच्या लग्नाकडे लक्ष दे, इथं २७ नंबर काउंटरवर रसगुल्ले देत नाहीयेत. आता व्हेज कोल्हापुरीही देणं बंद केलंय,’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ही कमेंट तुफान व्हायरल झाली आहे.
याशिवाय, “सुनील सर, अथियाची विदाई झाली का?” असा प्रश्नही एका नेटकऱ्याने विचारला आहे.
दरम्यान, सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी हिचा विवाह सोहळा क्रिकेटपटू केएल राहुलबरोबर खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडत आहे. दोघांच्या लग्नासाठी पाहुणे फार्म हाऊसवर पोहोचले आहेत.