Govinda Sunita Ahuja : गोविंदा आणि सुनीता आहुजा लग्नाच्या ३७ वर्षानंतर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. या चर्चांनंतर पहिल्यांदाच सुनीता आहुजाने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. सुनीता आहुजा गुरुवारी संध्याकाळी मुंबईत एका इव्हेंट शोमध्ये सहभागी झाली होती आणि यावेळी तिच्याबरोबर तिचा मुलगा यशवर्धन आहुजा आणि मुलगी टीना आहुजा होती, पण गोविंदा कुठेच दिसत नव्हता. गोविंदा नसल्याचं पाहून पापाराझींनी प्रश्न विचारला आणि त्यावर सुनीताने दिलेल्या उत्तराची चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये पापाराझींनी सुनीताला विचारलं की गोविंदा सर कुठे आहे? यावर सुनीता म्हणाली ‘काय?’ यानंतर सुनीताने मुलाबरोबर पोज दिल्या. त्यावेळी पापाराझी म्हणाले की, आम्ही गोविंदा सरांना मिस करत आहोत. यावर सुनीता म्हणाली, “आम्हीही करतोय.”

तसेच सुनीताचा आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या मुलीबरोबर पोज देत आहे. पापाराझी सुनीताला वारंवार गोविंदाबद्दल विचारतात. त्यावर ती “आम्हीही त्यांनाच शोधत आहोत” असं म्हणताना दिसत आहे.

पापाराझींनी प्रश्न विचारल्यावर सुनीताने पतीबद्दल दिलेलं उत्तर चाहत्यांना फार रुचलं नाही. लोकांनी सुनीतावर खूप टीका केली. एका युजरने म्हटलं की, ती अशा प्रकारे गोविंदाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तर काहींच्या मते, लोक तिला गोविंदामुळे ओळखतात आणि ती त्याच्याबद्दल विचारल्यवर अशा प्रतिक्रिया देत आहे.

गोविंदा व सुनीता यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा

गोविंदाच्या पायात गोळी लागल्यावर सुनीताच्या अनेक मुलाखती आल्या, ज्यामध्ये तिने अशा गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे लोक या दोघांच्या नात्याबद्दल विविध गोष्टी बोलू लागले. सुनीता म्हणाली होती की ती वेगळ्या घरांमध्ये राहतात. तसेच पुढच्या जन्मी हा नवरा नको, गोविंदा माझी फसवणूक करत असेल तर त्याबद्दल कल्पना नाही अशी बरीच विधानं सुनीताने केली होती. त्यानंतर अचानक एका मराठी अभिनेत्रीमुळे सुनीता व गोविंदा घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर गोविंदाच्या वकिलाने प्रतिक्रिया दिली होती.

गोविंदाचे वकील आणि मित्र ललित बिंदल यांनी या अफवांबद्दल महत्त्वाची माहिती दिली होती. सुनीताने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, पण तो नंतर मागे घेतला. आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. तर “ते नवीन वर्षात नेपाळला गेले होते आणि पशुपती नाथ मंदिरात एकत्र पूजा केली. आता सगळं काही ठीक आहे. अशा गोष्टी जोडप्यांमध्ये घडतात, पण यामुळे नातेसंबंध मजबूत होतात. ते एकत्र होते आणि नेहमीच एकत्र राहतील,” असं बिंदल म्हणाले होते.