गदर २ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात चर्चा आहे ती अभिनेता सनी देओलची. या सिनेमाला प्रचंड यश मिळालं आहे. तसंच त्याच्या बंगल्याच्या लिलावामुळे सनी देओलची चर्चा झाली. मात्र बँक ऑफ बडोदाने एक नोटीस काढून हा लिलाव रद्दही केला आहे. अशात सनी देओलने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. २०१९ मध्ये खासदार भाजपाच्या तिकिटावर सनी देओल निवडून आला होता. आता त्याने २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे.
सनी देओलने काय घोषणा केली आहे?
मनोरंजनाच्या जगात मी माझ्या मनाप्रमाणे काम करतो. मला जी भूमिका आवडते ती भूमिका मी साकारतो. मात्र राजकारणाचं तसं नाही. मी कुणाला जर काम करण्याचं आश्वासन दिलं आणि ते माझ्याकडून झालं नाही तर मला ते सहन होत नाही असं सनी देओलने म्हटलं आहे. तसंच निवडून आल्यापासून फक्त १९ टक्के उपस्थितीवरही सनी देओलने भाष्य केलं. तो म्हणाला संसदेत देश चालवणारे लोक बसले आहेत. मात्र त्यांची वागणूक तुम्ही पाहिली का? मी हे पाहिलं की मला हे वाटतं की मी असा नाही. मी एक विचार घेऊन राजकारणात आलो होतो. मात्र आता माझ्या लक्षात आलं आहे की मी जे काही काम करतो आहे ते एक अभिनेता म्हणूनही करु शकतो. माझ्यासाठी एकाचवेळी अनेक कामं करणं अशक्य आहे. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही.
बंगल्याच्या लिलावाबाबत काय म्हटलंय सनी देओलने?
सनी देओलने ५६ कोटींची थकबाकी ठेवल्याप्रकरणी बँक ऑफ बडोदाने त्याच्या मुंबईतल्या सनी व्हिला या बंगल्याचा लिलाव करण्याची नोटीस जारी केली होती. मात्र सोमवारी ही नोटीस मागे घेण्यात आली आणि लिलाव रद्द करण्यात आला. एक दिवसात नोटीस मागे कशी घेण्यात आली? यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत विचारलं असता मी या विषयावर काहीही उत्तर देणार नाही असं सनी देओलने म्हटलं आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने हे भाष्य केलं आहे.
सनी देओलचा गदर २ चित्रपट चांगली कमाई करत आहे. त्यातच रविवारी बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या जुहू येथील सनी व्हिला बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार सनी देओलने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने त्याच्या या बंगल्याचा लिलाव करण्यात येणार होता. त्याने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले, मात्र त्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे त्याच्यावर ५६ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी २५ सप्टेंबरला सनी व्हिलाचा लिलाव करण्यात येणार होता. यासाठी ५१ कोटी ४३ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र सोमवारी बँकेकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकानुसार हा लिलाव तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र या सगळ्यावर भाष्य करण्यास सनी देओलने नकार दिला आहे.