नव्वदीचे दशक हा सनी देओलच्या करिअरचा सुवर्णकाळ होता. या कालावधीमध्ये त्याचे अनेक ब्लॉकबास्टर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. त्याने ‘बेताब’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘घायल’, ‘दामिनी’, ‘गदर’ यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. या काळात सनी सुपरस्टार होता. त्याच्या अॅक्शन चित्रपटांचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता. त्यानंतर त्याच्या चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादाचे प्रमाण कमी-कमी होत गेले.
धर्मंद्र यांच्या प्रमाणे सनी देओलचे खासगी आयुष्य देखील खूप चर्चेत होते. जसजशी त्याच्या प्रसिद्धीमध्ये वाढ होत गेली, तसतसे त्याचे नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींशी जोडण्यात आले. त्याच्या ‘बेताब’ या चित्रपटाच्या माध्यमातून अमृता सिंहने देखील कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. माध्यमांमध्ये ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. १९८३ मध्ये सनी आणि पूजा यांचा विवाह झाला होता. ठराविक काळासाठी त्यांच्या लग्नासंबंधित गोपनियता पाळण्यात आली होती. याची माहिती मिळल्यानंतर अमृता आणि सनी यांचे नातेसंबंध संपुष्टात आले.
त्यानंतर सनी देओल डिंपल कपाडियाच्या प्रेमामध्ये पडला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तेव्हा डिंपल एकट्या राहत होत्या. त्यांचे राजेश खन्नांशी लग्न झाले होते. याच सुमारास त्यांच्या आयुष्यामध्ये सनीची एंट्री झाली. पुढे त्यांचे प्रेमप्रकरण खूप गाजले. त्यांनी ‘नरसिंहा’, ‘अर्जुन’, ‘आग का गोला’, ‘मंजिल मंजिल’, ‘गुनाह’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या अफेअरची ग्वाही खुद्द अमृता सिंह यांनी दिली होती.
धर्मंद्र यांनी ज्याप्रमाणे प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले होते, अगदी त्याच पद्धतीने सनीदेखील डिंपल यांच्याशी लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. सू्त्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा देओल यांनी तुम्ही डिंपलसह असलेले संबंध तोडले नाही, तर मग मी मुलांना घेऊन घर सोडून जाईन अशी धमकी दिल्यानंतर सनी-डिंपल यांच्या नात्याचा शेवट झाला.