अभिनेता सनी देओलने ३९ वर्षांपूर्वी ‘बेताब’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामुळे सनी देओल रातोरात स्टार झाला. चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री अमृता सिंगची मुख्य भूमिका होती. या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. ९० च्या दशकात सनीने एका मागोमाग एक बरेच हिट चित्रपट दिले होते. ज्यात ‘त्रिदेव’, ‘अर्जुन’, ‘डकैत’, ‘घायल’, ‘लुटेरे’, जीत’, ‘घातक’, ‘बॉर्डर’ आणि ‘जिद्दी’ या चित्रपटांचा समावेश आहे. यापैकीच ‘डर’ हा त्याचा सर्वांत हिट झालेला चित्रपट होता. या चित्रपटात सनीबरोबरच शाहरुख खानची महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपट तर सुपरहिट झाला मात्र चित्रपटाच्या सेटवर शूटिंगच्या वेळी असं काही घडलं होतं की सनी देओलला राग अनावर झाला होता आणि त्याने रागाच्या भरात स्वतःची जीन्स फाडली होती.

‘डर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी असं काय घडलं की सनी देओल एवढा रागावला. एवढंच नाही तर त्याने या चित्रपटानंतर यशराज फिल्मसह पुन्हा कोणताच चित्रपट केला नाही. आज सनी देओलचा ६६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील हा रंजक किस्सा. या चित्रपटानंतर सनी देओलने शाहरुखशी बोलणंही बंद केलं. असं म्हटलं जातं की चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खानसह चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम सनी देओलला घाबरून राहत असे. सनी देओलने हा किस्सा ‘आप की अदालत’ सांगितला होता.

आणखी वाचा- “तुम्ही मोठ्या आहात म्हणून…” जया बच्चन यांचं ‘ते’ कृत्य पाहून उर्फी जावेद भडकली

सनी देओल म्हणाला होता, “त्यांना माझी भीती वाटायची कारण त्यांनी काही चुकीचं केलं असेल. कधी कधी असं काहीतरी होत असतं. जेव्हा एखादी गोष्ट मला समजत नाही किंवा मला वाटतं की यात काहीतरी वेगळं आहे. तेव्हा मी बैचन होतो. या चित्रपटाच्या वेळीही असंच काही घडलं होतं. मी एका सीनचं शूट करत होतो. ज्यात शाहरुख खान मला चाकू मारतो. या सीनवरून माझे बरेच वाद झाले होते. माझं म्हणणं होतं की, मी एक कमांडो ऑफिसर आहे असं दाखवलं आहे. मी फिट आणि एक्सपर्ट आहे असं दाखवलं जात होतं. तर मग हा एक सामान्य मुलगा मला कसं काय मारू शकतो.”

सनी देओल पुढे म्हणाला, “माझं म्हणणं होतं की तो मला तेव्हाच मारू शकेल जेव्हा त्याचं माझ्याकडे लक्ष नाही. पण मी एक कमांडो आणि त्याकडे पाहतोय आणि जर तो मला मारेल तर मग मी कमांडो कसा काय राहीन. यावरून माझा यश चोप्रा यांच्याशी बराच वाद झाला. मी मोठ्यांचा आदर करतो आणि त्यांना मान देतो. त्यामुळे मी काय करू हे मला त्यावेळी समजत नव्हतं. मी त्यांना काही बोलू शकत नव्हतो कारण ते वयाने मोठे होते. तर त्यावेळी मला एवढा राग आला की, मी माझे हात जीन्सच्या खिशात घातले. पण त्यावेळी माझा राग एवढा होता की रागाच्या भरात माझी पँट कधी फाटली हे मलाच कळलं नाही.”

आणखी वाचा- वडिलांना देव मानणारा सनी देओल सावत्र बहिणीचं तोंडही पाहणं पसंत करत नाही, कारण…

सनी देओलच्या म्हणण्यानुसार, त्याला त्यावेळी असं पाहून सगळेच घाबरले होते. सनी म्हणाला, “मी पाहिलं होतं कोणी घाबरून इकडे तिकडे पळत होतं. पण खरं तर मी कोणाला काहीच बोललो नव्हतो. मी काय चुकीचं केलं आहे हे मला त्यावेळी स्वतःलाच समजत नव्हतं.” दरम्यान ‘डर’ प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास १६ वर्षे सनी देओल शाहरुख खानशी बोलला नव्हता असं बोललं जातं. पण यावर स्पष्टीकरण देताना सनीने हा आरोप फेटाळला होता. सनी देओलच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’मध्ये दिसला होता. याशिवाय तो ‘गदर २’, ‘सूर्या’ आणि ‘बाप’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Story img Loader