सनी देओल म्हटलं की ‘ढाई किलो का हाथ’ हा डायलॉग आठवल्याशिवाय राहत नाही. या अभिनेत्याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्याच्या ‘गदर २’ चित्रपटालादेखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. आता मात्र कोणत्याही चित्रपटामुळे किंवा एखाद्या डायलॉगमुळे नाही, तर अभिनेता त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
विकी कौशलच्या तौबा तौबा या गाण्यातील गाजत असलेल्या डान्स स्टेप्स मी आधीच खूप वर्षांपूर्वी केल्या आहेत, असे त्याने म्हटले आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अजय’ चित्रपटातील ‘छम्मक छल्लो’ हे गाणे शेअर केले आहे. एडिट केलेल्या या व्हिडीओतील डान्स तोच आहे; पण गाणे बदलले आहे. ‘छम्मक छल्लो’ गाण्याऐवजी ‘तौबा तौबा’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘तौबा तौबा’ गाण्यातील स्टेप्सशी जुळणारा हा डान्स असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना सनी देओल म्हणतो, “जेव्हा ते म्हणत असतात की, तुला जमणार नाही, तू हे करू शकणार नाही; पण तुमच्या असं लक्षात येतं की, तीच गोष्ट तुम्ही कोणाच्या तरी खूप आधी केलेली आहे.” अभिनेत्याच्या या म्हणण्याला ‘बॅड न्यूज’ चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरनेदेखील पाठिंबा दिला आहे. करण जोहरने तीच स्टोरी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट करताना, सनी देओल तुम्हीच हे आधी केले आहे, असे म्हणत त्याने अभिनेत्याप्रति आपले प्रेम दर्शविले आहे. सनी देओलने शेअर केलेला व्हिडीओ एका चाहत्याने बनवला असून, सनी देओलने विकीने केलेला डान्स खूप आधी केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, विकी कौशलच्या बॅड न्यूज या चित्रपटातील तौबा तौबा गाण्यातील डान्समुळे विकीचे चाहत्यांपासून ते बॉलीवूड कलाकारांपर्यंत सगळे जण कौतुक करताना दिसत आहेत. ‘तौबा तौबा’ गाणे प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे डान्सच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या हृतिक रोशननेदेखील विकीने ज्या प्रकारे गाण्याचे सादरीकरण केले आहे, त्याचे कौतुक केले आहे. त्याबरोबरच बॉलीवूडच्या भाईजाननेदेखील विकीचे कौतुक करीत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. या दिग्गज अभिनेत्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर विकीला आनंद झाल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.
दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्याच्या या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील बनविल्या जात असून, प्रेक्षकांनादेखील विकीचे हे गाणे आवडल्याचे पाहायला मिळत आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलबरोबर तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता गाण्याप्रमाणेच चित्रपटदेखील प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.