गेल्या दोन वर्षांपासून नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. सातत्याने या चित्रपटाविषयी नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटात राम-सीतेच्या भूमिकेत रणबीर कपूर, साई पल्लवी झळकणार आहेत. पहिल्यांदाच रणबीर-साईची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचं निश्चित झालं आहे. याबाबत सनी देओलने नुकतंच भाष्य केलं.

‘न्यूज-१८’ वृत्तसंस्थेने ८ एप्रिलला ‘रायझिंग भारत समिट २०२५’ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सनी देओल प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. यावेळी सनीने नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारत असल्याचा खुलासा केला. अभिनेता म्हणाला, “‘रामायण’ चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार असल्याची माहिती खरी आहे.” त्यानंतर सनी देओलला तू धार्मिक आहेस का? असं विचारलं. त्यावर अभिनेता म्हणाला, “कोण देवाला मानत नाही? आपण सर्वजण देवाच्या कृपेनेच आहोत.”

पुढे अभिनेत्याला विचारण्यात आलं की, जेव्हा ‘रामायण’ चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेबद्दल विचारणा झाली तेव्हा ही भूमिका आव्हानात्मक वाटली का? या प्रश्नाचं उत्तर देत सनी देओल म्हणाला की, आम्हा कलाकारांना आव्हानात्मक गोष्टीचं आवडतात. कारण त्यामध्ये खरी मजा असते. आम्हाला पात्र योग्यरित्या साकारावे लागते आणि आमच्या दिग्दर्शकाचे ऐकावे लागते. मी माझ्या भूमिकेत स्वतःला झोकून देतो. जेणेकरून प्रेक्षक त्यावर विश्वास ठेवतील. मी अद्याप ‘रामायण’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली नाही. पण हा सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे.”

दरम्यान, नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या महिन्यात नमित मल्होत्राने जाहीर केलं होतं की, हा भव्य चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग २०२६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि दुसऱ्या भाग २०२७मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं बजेट ८३५ कोटी रुपये आहे.

माहितीनुसार, ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी व्यतिरिक्त दाक्षिणात्य सुपरस्टार यश, लारा दत्ता, शीबा चड्ढा झळकणार आहे. या चित्रपटात यश रावणाची भूमिका, लारा दत्ता कैकेयीची भूमिका आणि शीबा चड्ढा मंथराची भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर व साई पल्लवीचा फोटो व्हायरल झाला होता.