Jaat Box Office Collection Day 1 : बॉलीवूड अभिनेता सनी देओलची मुख्य भूमिका असलेला ‘जाट’ चित्रपट गुरुवारी (१० एप्रिल रोजी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. सगळीकडे ‘जाट’ सिनेमाची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर ‘जाट’ चित्रपटाच्या कथेचे, दमदार अॅक्शन सीन्सचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. हा चित्रपट कुटुंबाबरोबर पाहता येईल, असंही लोक म्हणत आहेत. पण इतकं कौतुक होत असलं तरी या चित्रपटाने पहिल्या दिवशी फार चांगली कमाई केलेली नाही.
चाहते सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्या ‘जाट’ची आतुरतेने वाट पाहत होते. १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि अनेक ठिकाणी चाहत्यांनी सिनेमा पाहायला मोठी गर्दी केली. काही ठिकाणी तर हा सिनेमा पाहायला आलेले प्रेक्षक ढोल-ताशांच्या तालावर नाचताना दिसले. ‘जाट’बद्दल प्रेक्षकांमध्ये अफलातून क्रेझ दिसून आली. महावीर जयंतीची सुट्टी असल्याने हा चित्रपट जबरदस्त ओपनिंग करेल, असं वाटत होतं. मात्र पहिल्याच दिवशी सनी देओलचा ‘जाट’ कमाईच्या बाबतीत सलमान खानच्या ‘सिकंदर’पेक्षा मागे राहिला.
दिग्दर्शक गोपीचंद मलिनेनी दिग्दर्शित ‘जाट’ चित्रपटाचे बजेट तब्बल १०० कोटी रुपये आहे. सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्याबरोबर या चित्रपटात रम्या कृष्णन, विनीत कुमार सिंह आणि उर्वशी रौतेला यांच्याही भूमिका आहेत. ‘गदर २’ नंतर दोन वर्षांनी सनी देओल या ॲक्शन-मसाला चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर परतला. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘गदर २’च्या यशानंतर चाहते सनी देओलला ‘जाट’मध्ये बघण्यास खूपच उत्सुक होते.
‘जाट’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित ‘जाट’ चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ९.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘जाट’बरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’ रिलीज झाला. या सिनेमाने सनीच्या ‘जाट’पेक्षा जास्त कमाई केली आहे. अजित कुमारच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी २८.५ कोटी रुपयांच्या कमाई केली आहे.
सनी देओलच्या सिनेमाच्या ओपनिंगबद्दल बोलायचं झाल्यास त्याची पहिल्या दिवसाची कमाई सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटापेक्षा खूप कमी आहे. दबंग खानच्या ‘सिकंदर’ने पहिल्याच दिवशी देशभरात २६ कोटींची कमाई केली. त्या तुलनेत पहिल्याच दिवशी ‘सिकंदर’च्या निम्मीही कमाई ‘जाट’ला करता आली नाही.