बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या आगामी ‘जाट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. एकीकडे, सलमान खानचा ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर चढ-उतारात कमाई करत आहे. दुसरीकडे, ‘जाट’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. अशातच प्रदर्शनाच्या एक दिवस आधी निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. हा धक्का म्हणजे ‘जाट’मधील काही दृश्यांना कात्री लागणार आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘जाट’ चित्रपटातील २२ सीन काढून टाकण्यास सांगितलं आहे.
तसंच काही शब्दही काढून टाकण्यास सांगितलं आहे. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले २२ बदल केल्यानंतर ‘जाट’ला U/A १६+ प्रमाणपत्र दिले आहे. ‘जाट’ चित्रपटातील १० हृदयद्रावक दृश्ये बदलण्याचे आदेश सीबीएफसीने दिले आहेत. यामध्ये दोन गळा चिरण्याचे दृश्य, अंगठा कापण्याचे दृश्य, बर्फाच्या तुकड्यावर शिरच्छेद आणि रक्ताने माखलेले डोके, चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा पुतळा, एका मुलाचा विनयभंग, जमावाच्या पायाखाली भारतीय चलनी नोटा अशा काही दृश्यांचा समावेश आहे.
काही दृश्यांबरोबरच ‘जाट’मधील काही शब्दांनादेखील कात्री लावण्यात आली आहे. एका दृश्यात ‘भारत’ हा शब्द ‘हमारा’ या शब्दाने बदलण्यात आला आहे. ‘मदरजात’ हा शब्द बदलला आहे. ‘सेंट्रल’ शब्दाऐवजी ‘लोकल’ शब्द बदलण्यात आलं आहे. तसंच अनेक दृश्ययांमधील अपशब्द काढून टाकण्यात आले आहेत आणि त्याऐवजी ‘निकम्मा’ आणि ‘बेशरम’ असे काही शब्द वापरले आहेत.
उद्या प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या दुसऱ्या दिवशी ३६,९१७ तिकीट विकून चांगला व्यवसाय केला आहे. देशभरातील ७३ हजारांहून अधिक शोसाठी ही तिकीट बुक करण्यात आली आहेत. अशाप्रकारे, सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाने प्रदर्शन होण्यापूर्वीच ६३.४९ लाख रुपये कमावले आहेत.
दरम्यान, ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांतून सनी देओलने स्वत:ची ओळख निर्माण केली केली. ‘बेताब’, ‘पाप की दुनिया’, ‘क्रोध’, ‘राम अवतार’, ‘घायल’, ‘योद्धा’, ‘हिंमत’, ‘जित’, ‘गदर’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्याचा ‘गदर २’ हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता त्याचा ‘जाट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.