Sunny Deol Movie Border 2 Release Date: सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाने मागच्या वर्षी चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. २०२३ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या मोजक्याच चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता. दोन दशकांनी ‘गदर’ चा रिमेक ‘गदर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या यशानंतर आता सनी देओलच्या एका जुन्या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. ‘बॉर्डर २’ कधी येणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. आता सिक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचा सिक्वेल सिनेमागृहांमध्ये कधी येणार याची तारीख आली आहे. मात्र, यासाठी प्रेक्षकांना अजून बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. २०२६ मध्ये हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्पिता खानपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर आयुष शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी माझ्या मुलाला…”
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, निर्माते या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच घेऊन येत आहेत. मुख्य म्हणजे यावेळी सनी देओलसोबत आयुष्मान खुराना देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खास भूमिका साकारणार आहे. प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचं झाल्यास हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितलं की भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचा गौरव करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रजासत्ताक दिनापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही असं निर्मात्यांना वाटतं आहे. त्यानुसार त्यांनी २६ जानेवारीपूर्वी २३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करायचा असं ठरवलं आहे.
या चित्रपटाच्या कथेवर जवळपास वर्षभरापासून काम सुरू आहे, असं म्हटलं जात आहे. ‘बॉर्डर पार्ट १’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट व्हावा, या दृष्टीकोणातून चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. मागच्या महिन्यात या चित्रपटाच्या कथेसंदर्भात माहिती समोर आली होती. यावेळी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या युद्धाची कथा दाखवण्यात येणार आहे. राजस्थानमधील थारच्या लोंगेवाला भारतीय चौकीवर ही लढाई झाली होती. हा आजवरचा सर्वात मोठा युद्धपट ठरणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह करत आहेत.