अभिनेता सनी देओलची मुख्य भूमिका असलेला ‘जाट’ हा चित्रपट नुकताच १० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट गोपीचंद मालिनेनी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सनी देओल बलदेव प्रताप सिंह या भूमिकेत पाहायला मिळत आहे, तर ‘जाट’ने बॉक्स ऑफिसवर सुरुवातीला चांगली कमाई केली पण आता ही कमाई घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर ‘छावा’, ‘स्काय फोर्स’, ‘सिकंदर’ हे चित्रपट वगळता इतर कुठल्याही हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खास कमाई केली नाही.

अशातच नुकताच प्रदर्शित झालेला सनी देओलचा ‘जाट’ हा चित्रपट मात्र या सगळ्याला अपवाद ठरत असल्याचं पाहायला मिळत होतं परंतु, आता या चित्रपटाचीही कमाई घसरत आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने ६१.५ कोटींचा गल्ला जमवला आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाने ९.५ कोटी, तर चौथ्या दिवशी १४ कोटींची कमाई केली होती.

‘छावा’, ‘स्काय फोर्स’, ‘सिकंदर’ या चित्रपटांनंतर ‘जाट’ हा आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक चालणारा चित्रपट आहे, त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची चर्चा होती. पण, आता कदाचित या सिनेमाचे शो कमी होतील असं म्हटलं जात आहे. प्रेक्षक कदाचित आता मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करणार नाहीत, याचं कारण अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘केसरी चॅप्टर २’ हा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे.

अक्षय कुमार, आर. माधवन, अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट आज १८ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता बघता हा सनी देओलच्या ‘जाट’ या चित्रपटाला मागे पाडू शकतो अशी चर्चा आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पहिला भाग ‘केसरी’ने जागतिक स्तरावर जवळपास २०० कोटींची कमाई केली होती, त्यामुळेच आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही तितकाच चांगला प्रतिसाद देतील का, हे पाहणं रंजक ठरेल.

दरम्यान, करन सिंग त्यागी दिग्दर्शित ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश राजवटीविरुद्ध न्यायालयात लढणारे वकील सी. शंकरन नायर यांच्या भूमिकेत असणार आहे. यासह चित्रपटात अभिनेता आर. माधवन, अनन्या पांडे हे कालाकारही झळकणार आहेत.