९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांतून सनी देओल(Sunny Deol)ने स्वत:ची ओळख निर्माण केली केली. ‘बेताब’, ‘पाप की दुनिया’, ‘क्रोध’, ‘राम अवतार’, ‘घायल’, ‘योद्धा’, ‘हिंमत’, ‘जित’, ‘गदर’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्याचा ‘गदर २’ हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळाले. गदर २ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जाट’ असे या सिनेमाचे नाव आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सनी देओलच्या या चित्रपटात रणदीप हुड्डादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला एक शेतकरी त्याच्या शेतात नांगरणी करताना दिसत आहे. त्याचवेळी त्याच्या नांगराखाली एक मृतदेह सापडतो. त्यानंतर पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणात मृतदेह एका ट्रॉलीमधून घेऊन जात आहेत. त्यानंतर एक महिला पोलिस अधिकारी गावकऱ्यांना विचारते की, या गावात काय झाले आहे? मात्र, गावकरी भीतीच्या छायेत असलेले दिसत आहेत. एक लहान मुलगा बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची आई त्याच्या तोंडावर हात ठेवते. मात्र, शेवटी तो मुलगा मोठ्याने ओरडत राणा तुंगा असे म्हणतो.

रणदीप हुड्डाची एन्ट्री पाहायला मिळते. तो म्हणतो, राणा तुंगाची लंका आहे, इथले रस्ते हे किलोमीटर्समध्ये नाही तर लोकांच्या मृतदेहावरून मोजतात. त्यानंतर एक महिला म्हणते की, या लंकेत पाऊल ठेवायला देवही घाबरतो. पुढे सनी देओलची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळते. तो गुंडांशी मारमारी करताना दिसत आहे. मी जाट आहे, असे तो त्वेषात म्हणताना दिसत आहे. तसेच तो राणा तुंगाला उद्देशून तुला व तुझ्या लंकेला इथेच संपवेन, असे म्हणताना दिसत आहे. त्यावर रणदीप हुड्डा म्हणतो की, ये, मी वाट बघतोय. रणदीप हुड्डा व सनी देओल यांची मारामारी एकीकडे पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे उपेंद्र लिमये म्हणतो की हा अ‍ॅटम बॉम्ब आहे. पुढे सनी देओल म्हणतो, “ये ढाई किलो की हात की ताकद पूरा नॉर्थ देख चुका है अब साऊथ देखेगा”, त्याचा हा डायलॉग लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटात मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत.

मैत्री मूव्ही मेकर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा, विजय देवरकोंडाचा डिअर कॉम्रेड, तसेच ज्युनिअर एनटीआर व महेश बाबूच्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती या प्रॉडक्शनने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालीनेनी यांनी केले आहे. हा चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. आता गदर २ नंतर या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात यश मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.