बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि सनी देओल हे दोघेही आघाडीचे स्टार बरीच वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते. पण सनी देओलचा ‘गदर 2’ सुपरहिट झाल्यानंतर एक सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. शाहरुख खानही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता आणि सनीला मिठी मारताना दिसला होता. आता सनीने शाहरुखबरोबरच्या दीर्घकालीन मतभेदांबाबत आणि पार्टीत झालेल्या भेटीबद्दल भाष्य केलं आहे.
“प्रत्येकजण आयुष्यात पुढे गेला आहे. ते त्यांच्याकडे जे आहे त्यात मानसिकदृष्ट्या आनंदी व सुरक्षित आहेत. जेव्हा ते लहान होते तेव्हा ते तसे नव्हते. आता सगळे आनंदी आणि समाधानी आहेत. काय चूक किंवा बरोबर हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे. काळानुसार सगळ्या गोष्टी नीट होत जातात. जे झालं ते तिथेच सोडणं सर्वात चांगलं. मला खूप आनंद झाला की सर्वजण माझ्या पार्टीत आले होते,” असं सनी देओल ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना म्हणाला.
दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या
‘डर’ चित्रपटाने यंदा ३० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सनी म्हणाला, “मी त्याचा (शाहरुख) खूप आभारी आहे. मला त्याच्याशी बोलल्याचं आठवतं. तो जवानच्या प्रमोशनसाठी दुबईला होता. मला वाटलं तो येणार नाही पण तो थेट तिथून आला. तो थोडा वेळ तिथेच होता. त्या पार्टीनंतर मला त्याला भेटण्याची किंवा त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली नाही पण जेव्हाही आमचं भेटणं, बोलणं होईल ते छान असेल.”
“बाबा कुणाला मारू नकोस”, घराबाहेर पडताना लेक मल्हार देतो सल्ला; नाना पाटेकरांनी केला खुलासा
“अभिनेता म्हणून आमच्याकडे ठराविक काळाने काही गोष्टी घडतात. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण थोडे वेगळे असतो आणि जसजसा वेळ जातो तसतसे आपण परिपक्व होऊ लागतो आणि आपल्याला जीवनात वास्तव काय आहे हे आपल्याला समजू लागते. आपण सगळेच खूप बदललो आहोत. हीच त्याबद्दलची सुंदर गोष्ट आहे. वेळच प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे,” असं सनी देओल म्हणाला.
सनी आणि शाहरुख यांच्यातील नाराजीची सुरुवात १९९३ मध्ये सुरू झाली होती. ते दोघेही यश चोप्रांचा ‘डर’ हा चित्रपट एकत्र करत होते. या चित्रपटात सनी मुख्य अभिनेता होता, मात्र शाहरुखचे नकारात्मक पात्र ज्या पद्धतीने दाखवण्यात आले त्यामुळे तो खूश नव्हता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून दोघांचं बोलणं बंद झालं होतं.