सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. त्या काळातही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. पण ‘गदर’सारखा सुपरहिट चित्रपट देऊनही सनी देओलला इंडस्ट्रीत काम मिळत नव्हते. खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत यामागचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘मैं हूं ना’ प्रदर्शित झाल्यावर फराह खानने मागितलेली सुश्मिता सेनची माफी; अभिनेत्रीने सांगितलं कारण
‘बीबीसी यूके’ला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने ‘गदर : एक प्रेमकथा’नंतरच्या संघर्षामय काळाची आठवण सांगितली आहे. सनी देओल म्हणाला “गदरपूर्वी मला कोणतीही अडचण नव्हती. पण ‘गदर’ खूप हिट चित्रपट होता आणि त्याचं कौतुकही झालं; पण तरीही मला काम मिळत नव्हतं. हे घडलं. कारण- जग बदलत होतं आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री बॉलीवूड बनत होती.”
सनी देओल पुढे म्हणाला, “मी उद्योगातील बड्या व्यक्ती किंवा मोठ्या कंपन्यांसोबत काम केलं नाही. कारण- मी त्यांच्याशी संबंध ठेवू शकत नव्हतो. मी ‘गदर’नंतर कोणतंही मोठं काम केलं नाही किंवा कोणत्याही लोकप्रिय चित्रपटाचा भागही नव्हतो.”
‘गदर २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकांत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करीत अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने हिंदीतील ‘KGF 2’लाही मागे टाकले आहे.