अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ चित्रपट ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे २० कोटींची कमाई केली आहे. सनी देओलचा ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ला टक्कर देत सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण ‘गदर २’ इतर चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे.
आठव्या दिवसाच्या कमाईनंतर चित्रपटाची एकूण आकडेवारी ३०४.१३ कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४०.१ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४३.०८ कोटींचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ५१.७ कोटी कमावले. यानंतर ‘गदर २’ ने चौथ्या दिवशी ३८ कोटींची कमाई केली. १५ ऑगस्ट रोजी चित्रपटाने सर्वाधिक ५५.४ कोटींचा व्यवसाय केला.
आणखी वाचा : ५६ कोटींच्या कर्जामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सनी देओलच्या बंगल्याबद्दल ‘या’ गोष्टी जाणून घ्या
आता ‘गदर २’ ने आणखी एक मोठा विक्रम रचल्याचं समोर आलं आहे. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करत ‘गदर २’ने दुसऱ्या वीकेंडलाही जबरदस्त कमाई करत शाहरुख खानच्या ‘पठाण’ला आणि राजामौली यांच्या ‘बाहुबली’लाही मागे टाकलं आहे. दुसऱ्या आठवड्यात छप्परफाड कमाई करणाऱ्या पहिल्या ५ चित्रपटात ‘गदर २’ने पाहिला क्रमांक पटकावला आहे.
दुसऱ्या वीकेंडला ‘गदर २’ने तब्बल ९०.४७ कोटींची कमाई केली आहे. ‘पठाण’ने दुसऱ्या वीकेंडला ६३.५० कोटी तर ‘बाहुबली’ने ८०.७५ कोटींचा व्यवसाय केला होता. या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत ‘गदर २’ने एक नवा विक्रम रचला आहे. ‘गदर २’ हा २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल आहे. तब्बल दोन दशकानंतर आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.