बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’ हा बहुचर्चित चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेले काही महीने या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर’ या सुपरहीट चित्रपटाच्या सीक्वलची प्रेक्षक याच्या घोषणेपासूनच वाट बघत होते. पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती आणि तशीच अपेक्षा या दुसऱ्या भागाकडूनही लोकांना होती.
इतकंच नव्हे तर या ‘गदर २’ने अडवांस बुकिंगमध्ये २० लाख तिकिटे विकल्याचा एक नवा रेकॉर्डही बनवला होता. चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. अद्याप आकडे समोर आलेले नसले तरी एकूणच या चित्रपटासाठी असलेली लोकांची उत्सुकता पाहता ‘गदर २’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरणार आहे असं चित्र दिसत आहे.
आणखी वाचा : Gadar 2 Review : जुन्या आठवणींना उजाळा देणारा बहुचर्चित ‘गदर २’ पाहायलाच हवा का? एकदा वाचा
शाहरुख खानच्या ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. अजूनही कोणत्याही चित्रपटाने हा टप्पा पार केलेला नाही. ‘पठाण’नंतर आता थेट ‘गदर २’ची वर्णी लागणार असल्याची अशी चर्चा आहे. ‘सॅकनिक’च्या रीपोर्टनुसार ‘गदर २’ पहिल्याच दिवशी ३५ कोटींच्या आसपास कमाई करू शकतो.
असं झालं तर ‘गदर २’ हा ‘पठाण’नंतर यावर्षीचा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दूसरा चित्रपट ठरेल. सनी देओलचा अभिनय आणि अॅक्शन लोकांनी खूप प्रशंसा केली आहे. एकूणच प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे. चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी पुन्हा बघायला मिळाली असून दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा हादेखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.