हरहुन्नरी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्या ‘खिचडी’मधील विनोदी ‘हंसा’ने प्रेक्षकांना पोट धरून हसवले, तर ‘छनछन’मधील कठोर उमाबेनने गंभीर व्हायला लावले. नंतर ‘रामलीला’मधील समाजाची मुखिया धनकोर बाँने मनात दहशत निर्माण केली. आज सुप्रिया यांची ओळख एका यशस्वी अभिनेत्रीबरोबरच दिग्गज अभिनेते पंकज कपूर यांची पत्नी अशीही आहे.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सुप्रिया पाठक यांनी पंकज कपूर यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल पहिल्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या यूट्यूबवरील चॅट शोमध्ये सुप्रिया पाठक यांनी आपली बहीण रत्ना पाठक शाहबरोबर हजेरी लावली. दोन्ही बहिणींनी अभिनेत्यासह दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. याविषयीच त्यांनी या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’चे निर्माते आणि सोनू निगम यांच्यातील वाद अखेर तीन वर्षांनी मिटले; नेमकं काय झालं होतं?

सुप्रिया म्हणाल्या, “आम्ही त्या वेळी एका चित्रपटात एकत्र काम करत होतो. तो चित्रपट केवळ आम्ही एकत्र यावं यासाठीच बनवला होता असं मला वाटतं, कारण तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. चित्रीकरणादरम्यान आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली अन् तो त्याच्या वाटेला गेला अन् मी माझ्या. त्यानंतर आम्ही मुंबईत पुन्हा भेटलो.” त्या वेळी सुप्रिया यांच्या या नात्याबद्दल त्यांच्या घरचे फार खूश नव्हते. त्यांची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री दीना पाठक त्यांच्या या नात्याच्या विरोधात होत्या.

याविषयी बोलताना सुप्रिया म्हणाल्या, “त्या वेळी घरातील बऱ्याच लोकांनी माझं मतपरिवर्तन करायचा प्रयत्न केला होता. माझ्या आईनेही अगदी शेवटपर्यंत माझं मत बदलायचा प्रयत्न केला, जेव्हा मी दोन मुलांची आई झाले तेव्हाही ती मला म्हणायची की तो तुला सोडून जाईल. तिला आजही असंच वाटतं की मी खूप मोठी चूक केली आहे, पण मी कुणाचंच ऐकलं नाही. माझा निर्णय झाला होता. रत्नाने मला प्रचंड पाठिंबा दिला.” सुप्रिया आणि पंकज कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. याबरोबरच सुप्रिया यांचं त्यांचा सावत्र मुलगा अन् अभिनेता शाहिद कपूरबरोबर छान नातं आहे.