ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘अॅनिमल’ चित्रपटामध्ये दिसले होते. त्यांनी त्यांचा मुलगा अभिनेता विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय यांच्या एकेकाळी चर्चेत राहिलेल्या अफेअरबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला विवेकच्या नात्याबद्दल काहीही माहिती नव्हती, याबद्दल दिग्दर्शक राम गोपाल वर्माने सांगितलं होतं, असा खुलासा सुरेश ओबेरॉय यांनी केला आहे. तसेच सलमान खानबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.
‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत सुरेश विवेक व ऐश्वर्याच्या नात्याबद्दल म्हणाले, “बऱ्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या. विवेकने मला त्याबद्दल कधीच सांगितलं नाही. रामू (राम गोपाल वर्मा) यांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. रामूच्या आधी मला अजून कुणीतरी सांगितलं होतं, त्यावेळी मी त्याला (विवेकला) समजावलं होतं की हे सगळं करू नकोस.”
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल विचारल्यावर सुरेश ओबेरॉय म्हणाले, “मी त्यांचा कधीच मित्र नव्हतो. मी त्यांचा को-स्टार होतो. आमचं नातं कामापुरतं होतं. माझी मैत्री डॅनी मुकुलशी होती. होय, मिस्टर बच्चन यांनी मला त्यांच्या वाढदिवसासाठी आमंत्रित केलं होतं, पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आणि ते बऱ्याच गोष्टी लोकांना कळू देत नाहीत. मात्र जेव्हाही आम्ही भेटतो तेव्हा आम्ही एकमेकांशी खूप छान वागतो.”
त्यानंतर सुरेश यांनी सलमान खान आणि सलीम खान यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. “मी त्यावेळी आणि आताही विवेकच्या प्रकरणात निश्चिंत होतो. आम्ही सगळे एकमेकांना खूप छान भेटतो. जेव्हाही सलमान खान मला भेटतो तेव्हा तो सिगारेट लपवतो आणि नंतर आदराने माझ्याशी बोलतो. मी नेहमी विवेकला सलीमजींच्या पाया पडायला सांगतो. मी सलीम भाईंचा आदर करतो. काही गोष्टी घडल्या पण माझे त्यांच्याशी संबंध चांगले आहेत,” असं सुरेश ओबेरॉय म्हणाले.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर सलमान खान व ऐश्वर्या राय एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉयची एंट्री झाली. दोघे एकमेकांना डेट करत असताना सलमान खान व विवेकचं भांडणं झालं होतं. सलमानने विवेकला धमकीही दिली होती. पण २००३ मध्ये विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रायचे ब्रेकअप झाले होते.