बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूरच्या आजोबांची भूमिका केली आहे. सुरेश ओबेरॉय हे इंडस्ट्रीतील प्रचंड अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे. नुकताच त्यांनी रणबीरबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. तसेच त्यांनी रणबीरवर चांगले संस्कार केल्याबद्दल दिवंगत ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचे कौतुक केले आहे.
यूट्यूब चॅनेल ‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत सुरेश ओबेरॉय यांनी रणबीर कपूरचे कौतुक केलं आणि त्याला एक अद्भुत व्यक्ती म्हटलं आहे. “रणबीर एक अद्भुत माणूस आणि एक अद्भुत अभिनेता आहे. तो इतरांशी खूप चांगला वागतो. त्याला ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी खूप चांगले संस्कार दिले आहेत. त्याच्याबरोबर काम केल्यानंतर मी नीतू यांना मेसेज पाठवला की, ‘तुम्ही तुमच्या मुलाला खूप चांगले संस्कार दिले आहेत. कुणाशी कसे वागावे हे त्याला बरोबर माहीत आहे,'” असं सुरेश ओबेरॉय म्हणाले.
‘अॅनिमल’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या शक्ती कपूर यांनीही या चित्रपटाचे आणि रणबीर कपूरचे कौतुक केले होते. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी रणबीरला इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हटलं होतं. तसेच दिवंगत ऋषी कपूर हे आपल्या मुलाचे यश पाहायला आता हवे होते, अशी इच्छा व्यक्त केली होती.
‘अॅनिमल’मध्ये एक वेगळी व हिंस्त्र व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रणबीरने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान. त्याची पत्नी आलिया भट्टने मुलगी राहाला जन्म दिला होता. राहाला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर अवघ्या काही तासांतच तो ‘अॅनिमल’च्या सेटवर परतला होता. या चित्रपटातील अभिनेता केपी सिंगने एका मुलाखतीत सांगितलं होतं की ज्या दिवशी रणबीरने राहाला घरी आणलं होतं, त्याच दिवशी तो रणबीरला पहिल्यांदा भेटला होता. सकाळी ११ वाजता तिला डिस्चार्ज मिळाला आणि दुपारी ३ वाजता तो सेटवर होता, असं केपी सिंग म्हणाला होता.