आज भारतातून दिसत असलेलं सूर्यग्रहण हे या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. संध्याकाळी ४.२२ ते ५.४२ या वेळेत दिसणारं हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आज लोक सन ग्लासेस किंवा इतर माध्यमांच्या सहाय्याने सूर्यग्रहण पाहू शकतात. पण काही वर्षांपूर्वी एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं लोकांसाठी धोकादायक होतं. पण हे सर्व माहीत असतानाही लोक घराबाहेर पडत असत ज्यामुळे त्यांना डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत असे. यासाठी ४२ वर्षांपूर्वी भारत सरकारने लोकांनी सूर्यग्रहण पाहू नये यासाठी एक हटके उपाय केला होता.
१६ फेब्रुवारी १९८० ला भारतातून सूर्यग्रहण दिसलं होतं. त्यावेळी सरकारला भीती होती की जर लोक कोणत्याही सुरक्षेच्या साधनांचा वापर न करता घरातून बाहेर पडले तर सूर्याच्या हानिकारक किरणांनी त्यांच्या डोळ्यांना हानी पोहोचू शकते. त्यावेळी लोकांना घरातच थांबवण्यासाठी सरकारने बॉलिवूडची मदत घेतली होती. त्यावेळी भारत सरकारने दूरदर्शनवर अमिताभ आणि धर्मेंद्र यांचा ‘चुपके- चुपके’ चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला होता.
८० च्या दशकात लोकांकडे टीव्ही होता आणि त्यातही रविवारी दूरदर्शनवर चित्रपटाचं प्रसारण होत असे. त्या काळात लोकांमध्ये चित्रपटांबद्दल वेगळंच आकर्षण होतं. अशात जेव्हा सूर्यग्रहणाच्या दिवशी सरकारने शनिवारीही अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या चित्रपटाचं प्रसारण करण्याचा निर्णय घेतला तर लोक खूश झाले. त्यावेळी अमिताभ आणि धर्मेंद्र यांचे बरेच चाहते होते. याचा फायदा घेत सरकारने लोकांना सुरक्षितता न बाळगता सूर्यग्रहण पाहण्यापासून वाचवलं होतं.
दरम्यान अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘चुपके-चुपके’ हा एक कॉमेडी चित्रपट होता. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले होते. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय शर्मिला टागोर आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटात धर्मेंद्रने प्रोफेसर परिमल त्रिपाठी यांची भूमिका साकारली होती.