Vicky Kaushal Chhaava Movie : विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा तुफान कमाई केली आहे. १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच सर्वत्र हाऊसफुल सुरू आहे. अनेक ठिकाणी विशेष शोचं आयोजन करण्यात येत आहे. यावरून ‘छावा’ची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार विकी कौशलचं ‘छावा’ सिनेमातील जबरदस्त अभिनयासाठी कौतुक करत आहेत.

बॉलीवूडमध्ये आलिया भट्ट, करण जोहर, तृप्ती डिमरी, राजकुमार राव यांच्यापासून ते मराठीत प्राजक्ता माळी, सिद्धार्थ चांदेकर, शरद पोंक्षे, अभिजीत चव्हाण अशा अनेक या कलाकारांनी गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विकीचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण देशभरात सध्या ‘छावा’ची चर्चा चालू आहे. अशातच टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यानेही ‘छावा’ सिनेमा पाहिला आहे.

सूर्यकुमार यादव गेली कित्येक वर्षे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी त्याला प्रेमाने ‘सूर्या दादा’ असेही म्हणतात आणि त्याला मराठी भाषाही बऱ्यापैकी अवगत आहे. यामुळेच ‘छावा’ सिनेमा पाहिल्यावर या खेळाडूने विकीसाठी खास मराठी भाषेत पोस्ट शेअर केली आहे.

सूर्यकुमारने अवघ्या तीन शब्दांची पोस्ट शेअर करत विकीचं कौतुक केलं आहे. ‘छावा’मध्ये छत्रपती संभाजी महाराज बुऱ्हाणपूरात औरंगजेबाच्या सैन्याला सामोरे जातात आणि याठिकाणी मराठे आणि मुघल यांच्यात युद्ध होतं असा सीन आहे. यादरम्यान, महाराजांनी सिंहाचा जबडा फाडल्याचा अंगावर काटा येईल असा प्रसंग आहे. या सीनचा फोटो शेअर करत यावर सूर्यकुमाकरने ‘भावा प्रॉपर छावा’ असं कॅप्शन देत विकीचं कौतुक केलं आहे. या कॅप्शनच्या पुढे सूर्या दादाने फायर, लव्ह आणि Evil Eye ( नजर ) हे इमोजी वापरले आहे.

Vicky Kaushal Chhaava Movie
सूर्यकुमार यादवची पोस्ट ( Vicky Kaushal Chhaava Movie )

विकी कौशलने सूर्यकुमारची ही स्टोरी इन्स्टाग्रामवर रिशेअर केली आहे. ‘भावा’ म्हणत अभिनेत्याने या भारतीय खेळाडूचे आभार मानले आहे. दरम्यान, ‘छावा’ सिनेमाने पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर ४११.४६ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर, जगभरात हा आकडा ५५५.३ कोटींवर पोहोचला आहे.

Story img Loader