Sushant Sing Rajput : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या घरात आढळल्यानंतर विविध प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकरणी आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर संशय होता त्यामुळे तिला अटकही झाली होती. पण रिया चक्रवर्तीला क्लिन चिट देण्यात आली आहे.

काय आहे हे प्रकरण?

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह १४ जून २०२० ला त्याच्या निवासस्थानी आढळून आला होता. सदर मृत्यूचं प्रकरण प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असली तरीही काही बाबींबाबत संशय निर्माण होत असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. आता सीबीआयने या प्रकरणात जो अंतिम अहवाल सादर केला आहे त्यात सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे असंच नमूद करण्यात आलं आहे. पीटीआयने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

सीबीआयच्या अहवालात काय मुद्दे?

१) सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याला आत्महत्येसाठी कोणीही जबरदस्ती केली नाही.

२) रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट मिळाली.

३) या प्रकरणी कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा ‘फाऊल प्ले’ आढळला नाही.

४) AIIMS च्या फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता नाकारली.

५) सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेत पाठवून तपास केला. त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.

रिया चक्रवर्तीला क्लिन चिट

सुशांत सिंगचे वडील के के सिंग यांनी रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केला असून रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लिन चिट दिली आहे.

तपास सीबीआयकडे कधी देण्यात आला होता?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिस करत होते. त्याचवेळी या प्रकरणी बिहारमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात अधिकार क्षेत्रावरून वाद निर्माण झाला. बिहार सरकारच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय तपासाला मान्यता दिली होती. १९ ऑगस्ट २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्याचे अधिकार दिले होते. या प्रकरणात सीबीआयने आता अंतिम अहवाल सादर केला आहे.