बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी नुकताच सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर संशय होता, त्यामुळे तिला अटकही झाली होती. पण अभिनेत्रीला आता याप्रकरणी क्लिन चिट देण्यात आली आहे. याबद्दल दिया मिर्झाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे यावर भाष्य केलं आहे.

“फक्त टीआरपीसाठी तिला प्रचंड त्रास दिला”, दिया मिर्झाची पोस्ट

दियाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत असं म्हटलं आहे की, “रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाची लेखी माफी मागण्याची हिंमत मीडियापैकी कोणाकडे आहे का? तुम्ही तिची शिकार करायला गेला होतात. फक्त टीआरपीसाठी तुम्ही तिला प्रचंड त्रास दिला आणि मानसिक छळ केलात. कृपया माफी मागा. कमीत कमी एवढे तर करूच शकता?”. या पोस्टद्वारे दियाने माध्यमांवर निशाणा साधला आहे. तसंच याप्रकरणी रियाची माफी मागावी असंही तिने म्हटलं आहे.

रिया चक्रवर्तीच्या मानसिक छळाबद्दल दिया मिर्झाचा प्रसारमाध्यमांवर थेट निशाणा

दिया मिर्झाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तिने या स्टोरीद्वारे निर्माण केलेल्या प्रश्नांवरही आता चर्चा होताना दिसत आहेत. अभिनेत्रीने रिया चक्रवर्तीच्या त्रासाला आणि मानसिक छळाबद्दल प्रसारमाध्यमांवर थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे आता यावर माध्यमांकडून कोणती प्रतिक्रिया व्यक्त होणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. तसंच यावर रियाचीही काय प्रतिक्रिया असणार? हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.

दिया मिर्झा इन्स्टाग्राम स्टोरी

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाबद्दल…

दरम्यान, १४ जून २०२० रोजी सुशांत सिंगचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरीही काही बाबींबाबत संशय निर्माण होत असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पाच वर्षांन सीबीआयने या प्रकरणात अंतिम अहवाल सादर केला आहे, ज्यात सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचे म्हटलं आहे आणि या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिन चिट देण्यात आली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा सीबीआयचा दावा

सुशांत सिंगचे वडील के. के. सिंग यांनी रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केला आहे रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना या प्रकरणातून क्लिन चिट देण्यात आली आहे.